मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची तातडीने हकालपट्टी करा...काँग्रेसचे राज्यपालांना साकडे - Congress meets Bihar Governor and demands suspension of CM and DyCM | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची तातडीने हकालपट्टी करा...काँग्रेसचे राज्यपालांना साकडे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

मुंगेरमधील लाठीमार आणि गोळीबार प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसने लावून धरली आहे. या प्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. 

पाटणा : मुंगेर येथे दुर्गा विसर्जनासवेळी 26 ऑक्टोबरला झालेल्या संघर्षावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक युवकाचा मृत्यू झाला होता. यावरुन राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना झालेल्या या घटनेने राज्य सरकार अडचणीत आले आहे. या प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली. 

मुंगेर येथे दुर्गा विसर्जनावेळी दोन गटांत संघर्ष झाला होता. त्यावेळी पोलिसांनी लाठीमारासह गोळीबार केला होता. यात एका 18 वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला होता तर काही जण जखणी झाले होते. यानंतर संतप्त जमावाने उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासह अनेक वाहनांची जाळपोळ केली होती. 

या प्रकरणाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. निवडणूक आयोगाने पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचे आदेश दिले आहेत. याचबरोबर मगधचे विभागीय आयुक्त असंगबा चौबा यांना सात दिवसांत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर मुंगेरचे नवीन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची नियुक्तीही आयोगाने तातडीने केली आहे.  

या प्रकरणी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेतली. यानंतर बोलताना ते म्हणाले की, मुंगेर प्रकरणी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांची तातडीने हकालपट्टी करावी. मुंगेरमधील गोळीबारात ठार झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी. सत्ताधारी संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. यातील पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख