प्रदेशाध्यक्षांना आव्हान देणाऱ्या नेत्याला काँग्रेस दाखवणार बाहेरचा रस्ता - congress may expel leader lakhan jarkiholi from karnataka | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

प्रदेशाध्यक्षांना आव्हान देणाऱ्या नेत्याला काँग्रेस दाखवणार बाहेरचा रस्ता

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 एप्रिल 2021

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात एका नेत्याने उघड बंड पुकारले आहे. या नेत्याची लवकरच हकालपट्टी होणार आहे. 

बंगळूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्याविरोधात पक्षातील नेते लखन जारकीहोळी यांनी उघड बंड केले आहे. त्यांनी शिवकुमार यांना आव्हान देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जारकीहोळी यांची काही ज्येष्ठ भाजप नेत्यांनी भेट घेतली असून, ते भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जारकीहोळी यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची तयारी केली आहे. 

सेक्स स्कॅंडल प्रकरणात भाजप नेते रमेश जारकीहोळी यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पाच जारकीहोळी बंधूंमधील लखन हे सर्वांत लहान असून, ते काँग्रेसमध्ये आहेत. सेक्स स्कँडलमागे शिवकुमार यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. यावरुन लखन हे आक्रमक झाले आहेत. त्यांच्या नाराजीचा फायदा घेत भाजपने त्यांच्यासाठी गळ टाकला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत रमेश यांच्याविरोधात लखन यांचा पराभव झाला होता. लखन यांचे बंधू रमेश आणि भालचंद्र हे भाजप आमदार आहेत. 

बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. येथील भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांनी मुलीसमवेत लखन जारकीहोळी यांची नुकतीच भेट घेतली. लखन यांनी अंगडी यांचा प्रचार करण्याची घोषणा केली आहे. लखन यांचे बंधू सतीश जारकीहोळी हे येथून काँग्रेसचे उमेदवार आहेत. याचबरोबर भाजपचे मंत्री जगदीश शेट्टर, उमेश कत्ती, बायरती बसवराज आणि खासदार एरन्ना कदादी व अण्णासाहेब जोल्ले यांनी लखन यांची भेट घेतली आहे. 

लखन जारकीहोळी यांनी म्हटले आहे की, कर्नाटकात काँग्रेस केवळ एका पक्षावर अवलंबून आहे. हा नेता म्हणजे डी.के.शिवकुमार. काँग्रेसमध्ये राज्यात चार गट पडले असून, पक्षांतर्गत भांडणे वाढली आहेत. यामुळे पक्ष आता जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यात अपयशी ठरत आहे. माझे बंधू रमेश आणि भालचंद्र यांच्यासोबत चर्चा करुन मी भाजप प्रवेशाचा निर्णय घेणार आहे. 

यावर काँग्रेसच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील नेत्यांनी लखन जारकीहोळी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून लवकरच हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. राज्यातील काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नसून, पक्षात एकी असल्याचा संदेश अनेक नेत्यांनी दिला आहे. याचबरोबर लखन जारकीहोळी यांच्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला आहे. 

अश्लील व्हिडिओप्रकरणी कर्नाटकातील भाजपचे मंत्री रमेश जारकीहोळी यांना राजीनामा द्यावा लागला होता. नंतर या व्हिडीओतील तरुणीने आणखी एक नवा व्हिडीओ जाहीर केला होता. त्यात तिने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्याकडे या प्रकरणात मदतीसाठी गेल्याचा दावा केला होता. यावर शिवकुमार यांनी मात्र, हात झटकले होते. या प्रकरणावरुन आक्रमक झालेल्या भाजपने शिवकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख