कोरोनाबाधित शशी थरुर रुग्णालयातून म्हणाले, माझ्यासारखे तुमचे हाल होऊ नयेत!

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. यामुळे सरकारने कोरोना लसीकरणावर भर दिला आहे.
congress leader shashi tharoor demands universal free covid vaccination
congress leader shashi tharoor demands universal free covid vaccination

नवी दिल्ली : देशात कोरोना (Covid-19) संसर्गाची दुसरी लाट आली आहे. यामुळे सरकारने कोरोना लसीकरणावर (Covid Vaccination) भर दिला आहे. असे असले तरी देशात कोरोना लशीची टंचाई निर्माण झाली आहे. काँग्रेस (Congress)  नेते व खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांना कोरोना संसर्ग झाला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी रुग्णालयातील बेडवरून परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी मोदी सरकारचे कान टोचले आहेत. 

शशी थरुर यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी केंद्र सरकारच्या कोरोना लसीकरण मोहिमेचे वाभाडे काढले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मी अद्याप कोरोनातून बरा झालेलो नाही. कोरोना संसर्गातून झालेल्या गुंतागुंतीमुळे मी रुग्णालयात उपचार घेत आहे. माझ्यासारखे इतर कुणाचे हाल होऊ नयेत, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मोफत वैश्विक लसीकरणाची मागणी सर्वांनीच करावी. 

लस खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने राज्ये, खासगी रुग्णालयांसह इतरांना परवानगी दिली आहे. खुल्या बाजारपेठेत स्पर्धा करीत वेगवेगळ्या दराने त्यांना लस विकत घेण्यास भाग पाडले जात आहे. याचवेळी केंद्र सरकार किफायतशीर दराने लस खरेदी करीत आहे. यामुळे केंद्र सरकारनेच लस खरेदी करुन ती जनतेला मोफत द्यावी, अशी मागणीही थरुर यांनी केली. 

केंद्र सरकारने वैश्विक लसीकरणाचे धोरण स्वीकारावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या मागणीचे थरुर यांनी समर्थन केले आहे. सर्व भारतीयांना डिसेंबर अखेरपर्यंत लस उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध नसताना सरकार हे आश्वासन कशा प्रकारे पूर्ण करणार आहे, असा सवालही थरुर यांनी उपस्थित केला आहे. 

देशात लसीकरण केंद्रे बंद 
सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, आता लस नसल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in