अर्णब गोस्वामींना कधीही होऊ शकते अटक...काँग्रेस नेत्याची पोलिसांकडे तक्रार - congress leader sachin sawant files police complaint against arnab goswami | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णब गोस्वामींना कधीही होऊ शकते अटक...काँग्रेस नेत्याची पोलिसांकडे तक्रार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 27 जानेवारी 2021

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे. 
 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी गोस्वामी यांच्याविरुद्ध कांदिवलीतील समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामुळे गोस्वामींना अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

या प्रकरणी सचिन सावंत आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गोपनीयता कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गोस्वामींवर गुन्हा दाखल करुन त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. गोस्वामींना बालाकोटमधील हल्ल्याची माहिती आधीच कुणी दिली हे समोर यायला हवे, असे सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरणी राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित असल्याने केंद्र सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, असे नुकतेच म्हटले होते. 

गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयचा वापर व्यवसायाच्या वाढीसाठी केल्याचे समोर आले आहे. गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयातील स्वत:च्या वजनाचा अभिमानाने उल्लेख केला होता. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख