आय लव्ह यू..! सचिन पायलट यांचे जयपूरमध्ये जोरदार स्वागत

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी पुकारलेले बंड अखेर शमले आहे. यामुळे राज्यातील गेहलोत सरकार पुन्हा एकदा स्थिर झाले आहे. मात्र, पायलट आणि गेहलोत यांच्या मनोमिलनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
congress leader sachin pilot greeted by supporters in jaipur
congress leader sachin pilot greeted by supporters in jaipur

जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले होते. आता पायलट यांचे बंड शमल्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी 14 ऑगस्टला विधानसभा अधिवेशन बोलावले आहे. यामुळे राज्यातील राजकीय हालचाली पुन्हा वेगवान झाल्या आहेत. सुमारे महिनाभरापासून राजस्थानपासून दूर असलेले पायलट यांचे राज्यात आगमन झाले अन् कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलट यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची 9 ऑगस्टला भेट घेतली होती. यानंतर 10 ऑगस्टला त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यांना तातडीने भेटीची वेळ देण्यात आली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत राहुल यांच्यासोबत प्रियांका गांधी याही होत्या. या दोन्ही नेत्यांनी पायलट यांच्याशी चर्चा केली. याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि के.सी.वेणुगोपाल यांच्या संपर्कात पायलट कायम होते. पायलट यांनी आता मवाळ भूमिका घेतली आहे. ते पक्षात परत येण्याच्या प्रयत्नात आहेत. याचवेळी त्यांच्यासोबत गेलेले बंडखोर आमदारही परत येण्याच्या वाटेवर आहेत.

पायलट यांचे समर्थक आमदार आता पुन्हा काँग्रेसच्या गोटात परतू लागले आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी पायलट यांना दिले आहे. मात्र, याचवेळी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी गेहलोत यांच्या पारड्यात मत टाकण्याची अट पायलट यांच्यासह बंडखोर आमदारांना घालण्यात आली आहे. यामुळे काही बंडखोर आमदार हे गेहलोत यांना भेटले आहेत. त्यांनी गेहलोत सरकारला पाठिंबाही दर्शविला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

गेहलोत यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावल्यानंतर पायलट हे हरियानात गेले होते. आज तब्बल महिन्यानंतर पुन्हा राजस्थानमध्ये ते दाखल झाले. जयपूरमधील निवासस्थानी पोचल्यानंतर स्मितहास्य करीत पायलट हे समर्थकांसमोर दोन्ही हात जोडून नमस्कार करीत आले. त्यांनी सर्वांसमोर झुकून नमस्कार केला आणि हात दाखवून सर्वांना अभिवादन केले. या वेळी कार्यकर्ते 'आय लव्ह यू' असा घोष करीत होते. 

या वेळी बोलताना पायलट म्हणाले की, मी कोणतेही पद मागितलेले नाही. प्रशासन, कार्यपद्धती आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा मुद्दा मी उपस्थित केला आहे. देशद्रोहाची नोटीस देण्यात आल्याबद्दल मला खेद वाटतो. ही नोटीस 25 दिवसांनंतर पुन्हा मागे घेण्यात आली. आम्ही न्यायालयात गेलो, अनेक गुन्हे दाखल झाले. हे सर्व टाळता आले असते. सूडाचे राजकारण करता कामा नये. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची माझी तयारी आहे. 

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com