मला तिकिट नको पण त्याला तरी कशाला देता...काँग्रेस नेत्याचे बंडाचे निशाण - congress leader rishi mishra challenges party leadership in bihar | Politics Marathi News - Sarkarnama

मला तिकिट नको पण त्याला तरी कशाला देता...काँग्रेस नेत्याचे बंडाचे निशाण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात डॉ.मकसूर अहमद उस्मानी हे उतरले आहेत. यावरुन मोठा वादंग बिहारच्या राजकारणात सुरू झाला आहे. यावरुन पक्षात बंडखोरी सुरू झाली आहे. 
 

पाटणा : बिहारमध्ये जाले मतदारसंघात डॉ. मसकूर अहमद उस्मानी यांना काँग्रेसने तिकिट दिल्याने मोठा वादंग सुरू झाला आहे. माजी रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्रा यांचे नातू ऋषी मिश्रा यांना तिकिट नाकारून उस्मानी यांना देण्यात आले आहे. यामुळे ऋषी यांनी आता बंडाचे निशाण फडकावले आहे. पक्षाच्या नेतृत्वाने या प्रकरणी जाहीर माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले आहे. 

एकवेळ मला तिकिट देऊ नका पण उस्मानीसारख्या देशद्रोह्याला तिकिट कशाला देता, अशी भूमिका ऋषी यांनी घेतली आहे. ते म्हणाले की, मला पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही याचे दु:ख वाटत नाही. त्यांनी उमेदवारी दुसऱ्या कोणाला तरी द्यायला हवी होती. परंतु, एका जिना समर्थकाला पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्याने त्याच्या कार्यलयात जिनांचा फोटो लावला होता. याचबरोबर देशद्रोहाच्या गुन्ह्यातून तो जामिनावर सुटला आहे. जालेमधून लढण्यासाठी मी संयुक्त जनता दल सोडले होते. पक्षाने हा मोठी क्रूर थट्टा केली आहे. 

हे ही वाचा : चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले डॉ. उस्मानी आहेत तरी कोण? 

ऋषी मिश्रा यांनी बिहारचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मदन झा यांनाही लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उमेदवारांची नावे निश्चित केली असे, मदन झा सांगतात. काँग्रेस हा गांधींच्या विचाराणे चालणारा पक्ष असून, त्याला जिनांच्या विचाराने चालणारा पक्ष बनवू नका. गांधींच्या देशात आपण जिनांचा फोटो ठेवू शकत नाही. यामुळे पक्षाचीच प्रतिमा खराब होत आहे. उस्मानी यांना तिकिट दिल्याबद्दल झा आणि सोनिया गांधी यांनी खुलासा करायला हवा. याचबरोबर या मुद्द्यावर झा यांनी राजीनामा द्यायला हवा. 

ललित नारायण मिश्रा हे काँग्रेसचे बिहारमधील दिग्गज नेते मानले जात. ते रेल्वेमंत्री होते. समस्तीपूर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्बस्फोटात 1975 मध्ये त्यांच्या मृत्यू झाला होता. यानंतर मिश्रा यांचे कनिष्ठ बंधू जगन्नाथ मिश्रा बिहारचे मुख्यमंत्री झाले होते. ऋषी मिश्रा यांचे पिता विजयकुमार मिश्रा दरभंगामधून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी 1984 आणि 1989 मध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. ते 2014 पासून संयुक्त जनता दलाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. 

याआधी ऋषी मिश्रा यांनी 2015 मध्ये जाले मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा भाजपच्या जिबेश कुमार यांनी पराभव केला होता. त्याआधी झालेल्या पोटनिवडणुकीत ऋषी यांनी तेथे विजय मिळवला होता.  

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख