जिनासमर्थक कोण..जिनांचे पोर्ट्रेट न हटवणारे मोदी की उस्मानी?

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काँग्रेसने उस्मानी यांना तिकिट दिले असून, याविरोधात भाजपने जोरदार मोहीम सुरू केली आहे.
congress leader randeep surjewala slams bjp over jinaah portrait issue
congress leader randeep surjewala slams bjp over jinaah portrait issue

पाटणा : बिहारमध्ये जाले मतदारसंघात डॉ. मसकूर अहमद उस्मानी यांना काँग्रेसने तिकिट दिल्याने मोठा वादंग सुरू झाला आहे. कायम वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या उस्मानी यांना देशद्रोही आणि जिनासमर्थक ठरवले जात आहे. या मुद्द्यावर काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. एएमयूमधील जिनांचे पोर्ट्रेट हटवण्यासंदर्भात मोदींनीच पावले उचलली नाहीत, असा आरोपही सुरजेवाला यांनी केला आहे. 

अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी (एएमयू) विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष असलेल्या उस्मानी यांच्या उमेदवारीने बिहारमधील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. उस्मानी हे दरभंगा जिल्ह्यातील आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नागरिक नोंदणी सूची यांच्याविरोधातील आंदोलनात ते अग्रभागी होते. अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी स्टु़डंट्स युनियनच्या अध्यक्षपदी त्यांची डिसेंबर 2017 मध्ये निवड झाली होती. त्यांनी अजयसिंह यांचा 6 हजार 719 मतांनी पराभव केला होता. 

उस्मामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा 2019 मध्ये दाखल झाला होता. त्यांनी देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचबरोबर सफूरा झरगर आणि मीरन हैदर यांच्या अटकेबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याचा ठपका ठेवत ट्विटरवने त्यांचे अकाउंट चालू वर्षात तात्पुरते  बंद केले होते. उस्मानी यांच्या उमेदवारीनंतर राज्यात मोठा गदारोळ उडाला आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. याचबरोबर स्वपक्षातील नेतेही उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. 

रणदीप सुरजेवाला म्हणाले की, भाजप विनाकारण वाद उकरुन काढून तेढ निर्माण करीत आहे. आमचे जाले मतदारसंघातील उमेदवार कधीही जिनांच्या विचारसरणीशी जोडलेले नव्हते. ते अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीत (एएमयू) शिकत होते, त्यावेळी त्यांनी एमयूमधून जिनांचे पोर्ट्रेट हटवावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसद आणि मुंबई उच्च न्यायालयाला पत्र लिहिले होते. परंतु, या पत्राला पंतप्रधानांनी उत्तरही दिले नाही. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com