मोदी सरकारविरोधात आता संसदेतून रस्त्यावर उतरणार; राजीव सातवांचा हल्लाबोल

कृषी विधेयकांवरुन देशात वातावरण तापले आहे. या मुद्द्यावर सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. आता निलंबित आठ खासदारांचा मुद्दा गाजू लागला असून, विरोधकांनी अधिवेशनावर बहिष्कार घातला आहे.
congress leader rajeev satav target modi government over agriculture bills
congress leader rajeev satav target modi government over agriculture bills

नवी दिल्ली : कृषी विधयेकांवरुन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष मैदानात उतरले आहेत. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या आठ सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. यावरुन देश पातळीवर गदारोळ सुरू आहे. आता विरोधकांनी अधिवेशनावर बहिष्कार घातला आहे. या मुद्द्यावर आता सरकारच्या विरोधात सर्वच विरोधी पक्ष एकत्र आल्याचे चित्र आहे. दरम्यान, निलंबित खासदार व काँग्रेस नेते राजीव सातव यांनी आज मोदी सरकारवर हल्लाबोल केला. 

कृषी विधेयकांवर आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांनी पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. या निर्णयानंतर आठही निलंबित सदस्यांनी कालपासून सुरू असलेले धरणे आंदोलन मागे घेतले. निलंबित केलेल्या आठ राज्यसभा सदस्यांना पाठिंबा म्हणून आणि या दोन्ही वादग्रस्त विधेयकांबाबतच्या हमी भावासह तीन मागण्या सरकार मान्य करत नाही तोपर्यंत हा बहिष्कार सुरू राहील, असे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.  

राज्यसभेत कृषी विधेयके मांडताना २० सप्टेंबरला झालेल्या गोंधळाबद्दल सभापती वेंकय्या नायडू यांनी डेरेक ओ ब्रायन, डोला सेन,  राजीव सातव, रिपुन बोरा, नासिर हुसैन, संजय सिंह, के.के. रागेश, के ई. करीम या अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित केले आहे. यामुळे विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद आवारातच धरणे धरले होते. निलंबित खासदारांनी कालची रात्री संसद भवनातच घालवली होती. अखेर सभागृहातील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांनी धरणे मागे घेतले. 

पीठासीन अधिकाऱ्यांचा कल निलंबन मागे घेण्याकडे नाही हे लक्षात येताच काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी सभात्याग अस्त्र उगारले. समाजवादी पक्ष (सपा), राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी), द्रमुक, तृणमूल काँग्रेस (टीएमसी), आम आदमी पक्ष (आप), माकप आणि भाकप, राष्ट्रीय जनता दल, टीआरएस आणि बसप या पक्षांनी बहिष्काराचा सहभागी होण्याचा निर्णय घेतला. विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकल्यानंतर जेमतेम तीन तासांमध्ये चार विधेयके मंजूर करून घेतली. 

काँग्रेस नेते राजीव सातव यांनी काल ट्विट करुन संसद भवनाच्या आवारात रात्रीही धरणे सुरूच राहील, असे ट्विट केले होते. आज सकाळी त्यांना ट्विट करुन आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांसाठीचे आमचे आंदोलन आम्ही संसदेतून रस्त्यावर नेऊ. आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार! 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com