लोक आम्हाला 'जी 23' म्हणत असले तरी आम्ही आहोत 'गांधी 23'!

काँग्रेसमधील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. पक्ष नेतृत्वात बदल करण्यावरुन आग्रह धरणारे नेते आता आक्रमक झाले आहेत.
congress leader raj babbar says People say G23 I say Gandhi 23
congress leader raj babbar says People say G23 I say Gandhi 23

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करावा, यासाठी पक्षाच्या  23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाचे कान टोचले होते. आता पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. या पार्श्वभूमीवर या  'जी 23' नेत्यांच्या गटाने पुन्हा एकदा पक्षाला जुन्या गोष्टींची आठवण करुन दिली आहे. यातील ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि राज बब्बर यांनी जाहीरपणे पक्षाला सुनावले आहे. 

काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करण्यासोबत पक्ष संघटनेची फेररचना करावी, अशी मागणी करणारे पत्र 23 ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले होते. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. या नेत्यांनी उघडपणे बंडाची भाषा केल्याची टीका पक्षातूनच त्यांच्यावर करण्यात आली होती. यावर पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक होऊन पक्ष संघटनेत तातडीने फेरबदल करण्याचा निर्णय झाला होता. 

काँग्रेसमधील नाराजी व्यक्त करणाऱ्या नेत्यांमध्ये कपिल सिब्बल यांच्यासह 23 नेत्यांचा समावेश होता. या 'जी 23' नेत्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये आज झालेल्या शांती संमेलनात सहभाग घेतला. या वेळी माजी खासदार गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, राज्यसभा खासदार विवेक तंखा, लोकसभा खासदार मनीष तिवारी आणि हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हूडा आदी उपस्थित होते. 

या वेळी बोलताना राज बब्बर म्हणाले की, लोक म्हणतात की आम्ही 'जी 23' आहोत पण मी म्हणतो की आम्ही 'गांधी 23' आहोत. महात्मा गांधींचा विश्वास, निश्चय आणि विचारातून देशाचा कायदा व घटना तयार करण्यात आली. 'जी 23'ला काँग्रेसला भक्कम करायचे आहे. 

या वेळी बोलताना कपिल सिब्बल म्हणाले की, सत्य सांगायचे झाल्यास काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस कमकुवत होत चालला आहे. यासाठी आम्ही येथे एकत्र जमलो आहोत. याआधीही आम्ही एकत्र आलो होतो आणि पक्षाला भक्कम केले होते. आमचा आवाज हा पक्षाच्या भल्यासाठी आहे. पक्ष पुन्हा भक्कम व्हावा, अशीच सगळ्यांची इच्छा आहे. नवीन पिढी पक्षाशी जोडली जायला हवी.आम्ही काँग्रेसचे चांगले दिवस पाहिले आहेत. आमचे जसजसे वय होत आहे तसा पक्ष दुबळा झालेला आम्हाला पाहायचा नाही.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com