चीनचं नाव घ्यायलाही 56 इंचाच्या छातीचे पंतप्रधान घाबरतात!

भारत आणि चीनच्या सैन्यांत सिक्कीममध्ये झटापट झाल्याची बाब समोर आली आहे. यात काही जवान जखमीही झाले आहेत.
congress leader rahul gandhi slams narendra modi over china aggression
congress leader rahul gandhi slams narendra modi over china aggression

चेन्नई : भारत आणि चीनमध्ये सीमेवर तणाव सातत्याने वाढत आहे. यापूर्वी पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. आता सिक्कीमध्येही चीनच्या सैनिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांची झटापट होऊन काही जण जखमी झाले आहेत. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारला आहे. 

उत्तर सिक्कीमच्या नाकु खिंडीत गेल्या आठवड्यात ही घटना घडली. भारताच्या जवानांनी चीनच्या सैनिकांना रोखल्यानंतर जोरदार हाणामारी झाली. यात भारताचे चार जवान आणि  २० चिनी सैनिक जखमी झाले आहेत. मागच्या आठवडयात चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता, मात्र, भारतीय जवानांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. परंतु. भारतीय लष्कराकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव कायम असल्याची माहिती मिळत आहे.

तमिळनाडूत यावर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. भारत आणि चीनच्या सैन्यांदरम्यान सीमेवर झालेल्या ताज्या संघर्षाचा दाखला देत त्यांनी मोदींनी लक्ष्य केले. मोदी हे चीनचे नाव घ्यायलाही घाबरतात, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

देशाला कमजोर करणारी धोरणे केंद्रातील सरकार राबवत आहे. चीनला आपल्या हद्दीत घुसण्याची संधी आपलंच सरकार देत आहे. चीन भारतीय हद्दीत आक्रमण करीत आहे. आपले 56 इंचाची छाती असलेल्या पंतप्रधानांनी मागील काही महिन्यांत चीनचं नावही घेतलेलं नाही, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला.  

गेल्या वर्षी म्हणजेच मे 2020 पासून पूर्व लडाखजवळ प्रत्यक्ष ताबा रेषेवर चिनी सैन्याने अनेक ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. जूनमध्ये गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. यात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. मात्र, चीनने त्यांच्या मृत्यू झालेल्या सैनिकांचा आकडा जाहीर केला नव्हता. 

कालच (ता. 24) भारत आणि चीनमध्ये वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्यात 17 तासांची मॅरेथॉन बैठक झाली होती. या बैठकीत नेमका काय तोडगा निघाला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सीमेवरील तणाव कमी करावा आणि सैन्य मागे घेण्यासंदर्भात ही बैठक होती. सकाळी साडेनऊ वाजता सुरु झालेली ही बैठक रात्री अडीच वाजता संपली होती. भारतीय सैन्याकडून लेहमधील चौदाव्या कोअर कमांडरचे लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी चर्चा केली. आतापर्यंत भारत-चीनमध्ये चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या आहेत, परंतु त्यात अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com