कारणे कसली देता...सगळ्यांना कोरोना लस मिळायलाच हवी! - congress leader rahul gandhi says every indian deserves chance to life | Politics Marathi News - Sarkarnama

कारणे कसली देता...सगळ्यांना कोरोना लस मिळायलाच हवी!

वृत्तसंस्था
बुधवार, 7 एप्रिल 2021

देशभरात आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अशा वेळी सर्वांना कोरोना लस देण्याऐवजी सरकारने गरज असेल त्यांनाच लस देण्याची भूमिका घेतली आहे.
 

नवी दिल्ली : देशभरात आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोना रुग्णसंख्या विक्रमी पातळीवर गेली आहे. अशा वेळी सर्वांना कोरोना लस देण्याऐवजी सरकारने गरज असेल त्यांनाच लस देण्याची भूमिका घेतली आहे. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे. प्रत्येक भारतीयाला जगण्याचा हक्क आहे, असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वच प्रौढ नागरिकांना कोरोना लस द्यावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. यावर आरोग्य मंत्रालयाने लशीचा तुटवडा असल्याचे कारण देत गरज असेल त्यांनाच प्रथम लस देण्याची भूमिका घेतली आहे. वेळ आल्यानंतर सर्वांना लस देण्यात येईल, असेही म्हटले होते. 

याचा राहुल गांधींनी समाचार घेतला आहे. कुणाला गरज आहे आणि कुणाला लस द्यायची कारणे देत यावर वाद घालणे मूर्खपणाचे आहे. प्रत्येक भारतीयाला सुरक्षित आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, असे राहुल यांनी म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी सर्वांना मास्क घालून कोरोनाविषयक उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 

१ एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जात आहे. यासाठी सरकारने नोंदणीचे दोन पर्याय ठेवले आहेत. यासाठी सरकारी को-विन अॅपवर ऑनलाइन नोंदणी करण्याचा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय हा प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याचा असेल. मात्र, प्रत्यक्ष नोंदणीसाठी नागरिकांना दुपारी 3 वाजल्यानंतर लसीकरण केंद्रावर जावे लागेल. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. यातील कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सरकारने वाढवून 6 ते 8 आठवडे केले आहे. याआधी या दोन्ही लशींसाठी दोन डोसमधील अंतर 4 आठवडे होते. त्यामुळे आधी पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी नोंदणी आपोआप होत होती. आता दोन्ही लशींच्या दोन डोसमधील अंतर वेगवेगळे असल्याने आपोआप नोंदणी बंद करण्यात आली आहे. नागरिकांना पहिला डोस घेतल्यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्या डोससाठी नोंदणी करावी लागेल. 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख