मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आघाडी उघडत काँग्रेसच्या आमदाराने दिला 'शॉक' - congress leader navjot singh sidhu targets cm amarinder singh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आघाडी उघडत काँग्रेसच्या आमदाराने दिला 'शॉक'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जुलै 2021

पंजाब काँगेसमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याविरोधात काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी आघाडी उघडली आहे. 

नवी दिल्ली : पंजाब (Punjab)  काँगेसमधील  (Congress) संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्याविरोधात काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh  Sidhu) यांनी आघाडी उघडली आहे. ऊर्जा खाते हे मुख्यमंत्र्यांकडेच असून,  त्यांना राज्यातील विजेच्या समस्येवर 'शॉक' देण्याची खेळी सिद्धू यांनी खेळली आहे. 

सिद्धू यांनी आज 9 ट्विट करुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. यामागील विषय होता राज्यातील भार नियमन. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांकडेच ऊर्जा खात्याचा कार्यभार आहे. राज्यात विजेचे संकट असून, सामान्य जनता त्रस्त झाली आहे. सिद्धू यांनी म्हटले आहे की, पंजाबमध्ये भारनियमन करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. जर मुख्यमंत्र्यांनी कार्यालयीन वेळांचे नियोजन केले आणि एअर कंडिशनरच्या वापराचे नियमन केले तर या समस्येतून सुटका होऊ शकेल. 

सिद्धू यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय 2019 मध्ये घेतल्यानंतर त्यांना पक्षाने ऊर्जा खाते देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला होता. सिद्धू यांनी आज ट्विटवर आधीच्या शिरोमणी अकाली दलाच्या सरकारवरही ताशेरे ओढले. याचबरोबर मोफत 300 युनिट वीज देण्याची घोषणा करणाऱ्या आम आदमी पक्षालाही सुनावले. आधीच्या सरकारने खासगी औष्णिक वीज पुरवठा कंपन्यांसोबत केलेल्या करारांची तपासणी विद्यमान सरकारने करावी, अशी मागणीही सिद्धू यांनी केली आहे. 

हेही वाचा : भाजपच्या राज्यात चार महिन्यांत पडणार दुसऱ्या मुख्यमंत्र्यांची विकेट 

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पण त्याआधीच काँग्रेसमधील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने जोरदार खडाजंगी होत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे दिसते. सिद्धू यांची लोकप्रियता जास्त असल्याने पक्ष नेतृत्वालाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अवघड बनले आहे. 

अमरिंदरसिंग यांना भेट नाकारणाऱ्या नेतृत्वाने सिद्धू यांना भेट दिल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. सिद्धू यांचे पारडे आता जड झाल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी राज्यात काँग्रेसचे नेतृत्व अमरिंदर करतील हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसमधील संघर्ष वाढू लागल्याने दिवसेंदिवस नेतृत्वाची डोकेदुखी वाढू लागली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख