'आयटम' प्रकरणी मोठा खुलासा करीत कमलनाथ म्हणाले, आयटम-1, आयटम-2, आयटम-3...

मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांकडून प्रचारापेक्षा व्यक्तिगत चिखलफेकीला अधिक जोर आला आहे.
congress leader kamal nath clarifies about item remark against bjp leader
congress leader kamal nath clarifies about item remark against bjp leader

भोपाळ : माजी मंत्री व भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल बोलताना काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलेल्या 'आयटम' या उल्लेखावरुन गदारोळ उडाला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचा स्टार प्रचारक हा दर्जा काढून घेतला आहे. यावर कमलनाथ यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता या प्रकरणी कमलनाथ यांनी मोठा खुलासा केला आहे. 

मध्य प्रदेशात काँग्रेसची सगळी भिस्त कमलनाथ यांच्यावर आहे. त्यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा निवडणूक आयोगाने काढल्याचे काँग्रेसच्या जिव्हारी लागले आहे. या प्रकरणी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली होती. या प्रकरणी काँग्रेसकडून कायदेशीर सल्ला घेण्यात येत होता. आता कमलनाथ यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांचे स्टार प्रचारकपद काढून घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कमलनाथ यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालायने कमलनाथ यांची याचिका दाखल करुन घेतली आहे. 

कमलनाथ यांनी जाहीर सभेत बोलताना माजी मंत्री व भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. इमरती देवी उभ्या असलेल्या डाबरा मतदारसंघातील सभेत बोलताना कमनाथ यांनी आयटम असे संबोधन वापरले होते. कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. महिला उमेदवाराबद्दल असे विधान केल्याबद्दल कमलनाथ यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या मुद्द्यावर भाजपही आक्रमक झाला असून, कमलनाथ यांच्याविरोधात भाजपने मोहीम उघडली आहे. 

कमलनाथ यांनी या प्रकरणी आता खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, काही दिवसांपासून सुरू आहे की मी अपमान केला..मी अपमान केला. मी जे बोललो ते सगळ्यांसमोर बोललो आहे. मी लोकसभेत एवढी वर्षे राहिलो आहे. जागांची रिसीट असते. त्यावर आयटम नंबर 1, आयटम नंबर 2, आयटम नंबर 3 असे लिहिलेले असते. आयटम नंबर वन हा पंतप्रधान अथवा इतर कुणी मंत्री असतो. या भाषेशी मी परिचित आहे. 

माझा कुणाचाही अपमान करण्याचा उद्देश नव्हता. मी कुणाचा अपमान करण्यासाठी बोललो नव्हतो तरीही मी खेद व्यक्त केला होता. कारण त्यावेळी बोलताना मला समोरच्या व्यक्तीचे नाव आठवत नव्हते. आताही अनेक नावे मला आठवत नाहीत, असे कमलनाथ यांनी स्पष्ट केले. 

कमलनाथ यांना या प्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. या नोटिशीला दिलेल्या उत्तरात कमलनाथ यांनी इमरती देवींचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता, असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, निवडणूक आयोगाने कमलनाथ यांना वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी दोषी ठरवले होते. निवडणूक आयोगाने त्यांना तंबीही दिली होती. आचारसंहितेच्या काळात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करु नये, अशी ताकीद आयोगाने कमलनाथ यांना दिली होती. 

आता निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर कारवाईचे पाऊल उचलले आहे. निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेतला आहे. त्यांनी आचारसंहिता भंग केला असून, त्यांना दिलेल्या इशाऱ्याचे उल्लंघन केले आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com