मध्य प्रदेशच्या प्रचारात ओढले अंबानी अन् टाटांना..!

मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
Congress leader Jitu Patwari slams Shivraj Singh Chouhan
Congress leader Jitu Patwari slams Shivraj Singh Chouhan

भोपाळ : मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. आता काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये व्यक्तिगत चिखलफेक सुरू झाली आहे. काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना भाजपकडून लक्ष्य केले जात आहे. यामुळे कमलनाथ यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे नेते मैदानात उतरत असल्याचे चित्र आहे. आता काँग्रेसच्या एका आमदाराने  अंबानी आणि टाटांना प्रचाराच्या रणधुमाळीत ओढले आहे.  

कमलनाथ यांनी जाहीर सभेत बोलताना माजी मंत्री व भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. आमचा येथील उमेदवार तिच्यासारखा नाही...काय बरे तिचे नाव? असा सवाल कमलनाथ यांनी सभेला उपस्थित नागरिकांना केला होता. त्यावेळी नागरिकांना इमरती देवी यांचे नाव घेण्यास सुरूवात केली. यावर कमलनाथ म्हणाले होते की, माझ्यापेक्षा तुम्ही तिला चांगले ओळखता. तुम्ही लोकांनी आधीच मला सावधगिरीचा इशारा द्यायला हवा होता. ये क्या आयटम है. 

यावरुन भाजपने कमलनाथ यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. कमलनाथ यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आंदोलनही केले होते. याचबरोबर इमरती देवींनी कमलनाथ यांची तुलना भंगारवाल्याशी केली होती. त्यांनी म्हटले होते की, भंगारवाले ज्याप्रमाणे दारु पिऊन बसतात आणि एखादी महिला जात असेल तर तिला आयटम म्हणतात, तशाच प्रकारचे कमलनाथ लोफर आहेत. ते लुच्चे आणि लफंगे आहेत. 

आता या प्रकरणी काँग्रेसचे आमदार जितू पटवारी यांनी शिवराजसिंह यांना लक्ष्य करताना अंबानी आणि टाटांनाच प्रचारात ओढले. ते म्हणाले की, अनिल अंबानी, मुकेश अंबानी, रतन टाटा ही नावे आपण फक्त ऐकतो. या मोठ्या उद्योगपतींना कमलनाथ थेट कॉल करतात. हे कमलनाथ यांचे व्यक्तिमत्व आहे. शिवराजसिंह चौहान हे तर कमलनाथ यांच्या पायाची धूळही नाहीत. माझ्या अंतकरणापासून मी सांगतो की कमलनाथ हे मध्य प्रदेशचा विकास करतील. हे मी राजकारणासाठी बोलत नाही. 

याआधी काँग्रेसचे नेते दिनेश गुज्जर यांनी कमलनाथ हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे उद्योगपती असल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते की, कमलनाथ हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे उद्योगपती आहेत. ते शिवराज यांच्यासारखे भुकेल्या आणि दरिद्री घरातून आलेले नाहीत. शिवराज यांच्याकडे केवळ पाच एकर जमीन होती. आता त्यांच्याकडे हजारो एकर जमीन असून, ते शेतकऱ्यांचे रक्त पित आहेत. 

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुका 9 नोव्हेंबरला  होत आहेत. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. मध्य प्रदेश विधानसभेचे एकूण संख्याबळ 230 असून, सध्या भाजप 107, काँग्रेस 88, अपक्ष 4, बहुजन समाज पक्ष 2 आणि समाजवादी पक्ष 1 असे संख्याबळ आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com