भाजपने स्वत:च्याच दोन सज्जन मुख्यमंत्र्यांचे हसे करुन घेतले! - congress leader harish rawat slams bjp over uttarakhand cm resignation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

भाजपने स्वत:च्याच दोन सज्जन मुख्यमंत्र्यांचे हसे करुन घेतले!

वृत्तसंस्था
शनिवार, 3 जुलै 2021

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांनी राजीनामा दिला आहे. यावरुन विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने भाजपची कोंडी केली आहे. 

डेहराडून : उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री तिरथसिंह रावत (Tiath Singh Rawat) यांनी राजीनामा दिला आहे. भाजपमधील (BJP) पक्षांतर्गत गटबाजीमुळे अखेर रावत यांना पायउतार व्हावे लागले आहे. त्रिवेंद्रसिंह रावत यांच्यानंतर चार महिन्यांतच तिरथसिंह रावत यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले आहे. यावरुन माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते हरीश रावत यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. 

हरीश रावत म्हणाले की, सत्तारुढ भाजपने उत्तराखंडमधील दोन सज्जन नेत्यांची स्थिती हास्यास्पद करुन ठेवली आहे. आधी त्रिवेंद्रसिंह रावत यांना अर्थसंकल्पी अधिवेशनादरम्यान बदलण्यात आले होते. त्यांच्याकडेच अर्थ विभागाची धुरा होती. अधिवेशनादरम्यान अर्थसंकल्पावरील चर्चेचे उत्तर त्यांनाच द्यायचे होते. अर्थसंकल्पही मंजुरीसाठी त्यांनाच मांडायचा होता. परंतु, घाईघाईने त्रिवेंद्रसिंह यांना निरोप देण्यात आला. 

त्रिवेंद्रसिंह यांच्याएवढेच सज्जन असलेले तिरथसिंह यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. उरलेली कसर त्यांनी विविध प्रकारची वादग्रस्त विधाने करुन भरुन काढली. नंतर भाजपच्या नेतृत्वाने त्यांच्या निवडणूक लढवण्याबाबत निर्णय न घेऊन परिस्थिती हास्यास्पद बनवली. त्यामुळे ते विनोद ठरले आहेत. कधी निवडणूक लढवून विधानसभेत जायचे हेच मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल तर असा व्यक्ती आमचे कल्याण काय करणार, असा प्रश्न जनता विचारत होती, असे रावत म्हणाले. 

हेही वाचा : भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे चार महिन्यांत दोन मुख्यमंत्री 'आऊट'

पोटनिवडणुकीचाही तिढा 
रावत यांच्या भवितव्याचा निर्णय निवडणूक आयोगाच्या हाती होता. निवडणूक आयोगाने मात्र, निवडणुका घेण्याबाबत सावध भूमिका घेतली होती. मार्च-एप्रिल महिन्यांत काही राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निवडणूक आयोग टीकेचा धनी बनला होता. अनेक राज्यांत पोटनिवडणुका प्रलंबित आहेत. मात्र, कोरोना संकटाच्या काळात निवडणुका घेण्यास आयोग राजी नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

त्रिवेंद्रसिंह रावत यांनी चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी तिरथसिंह रावत यांची निवड झाली होती. पक्षांतर्गत नाराजीमुळे त्रिवेंद्रसिंह यांना पायउतार व्हावे लागले होते. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीपासून नारायणदत्त तिवारी वगळता एकाही मुख्यमंत्र्याला पदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. याला त्रिवेंदसिंहही अपवाद ठरले नव्हते. त्यांना राज्यातील अपूर्ण कार्यकाळाची प्रथा मोडून काढण्यासाठी केवळ एक वर्षाचा कालावधी राहिला होता. आता तिरथसिंह रावत यांनीही राजीनामा दिल्याने नवीन मुख्यमंत्री नेमावा लागणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख