रामविलास पासवान यांचा राजकीय वारसाच भाजपने संपवला.. - congress leader digvijay singh slams bjp over lok janshakti party performance | Politics Marathi News - Sarkarnama

रामविलास पासवान यांचा राजकीय वारसाच भाजपने संपवला..

वृत्तसंस्था
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

बिहारमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार हेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप नेत्यांनी नितीशकुमार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. 

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला केवळ एक जागा मिळाली आहे. रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होते. त्यांच्या पक्षाचे अस्तित्वच या निवडणुकीत पुसट झाले आहे. यावरुन काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत झाली होती. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस, डावे यांची महाआघाडी असे चित्र होते. एनडीने 125 जागा मिळवत स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे. याचवेळी महाआघाडीने 110 जागा मिळवल्या आहेत. 

राज्यात राष्ट्रीय जनता दल 75 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. दुसऱ्या क्रमांका वर 74 जागांसह भाजप आहे. जेडीयूला 43 जागा मिळाल्या असून, काँग्रेसला 19 जागा आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. याचवेळी लोक जनशक्ती पक्षामुळे नितीशकुमारांना 20 जागांवर फटका बसला आहे. नितीश यांच्या जेडीयूला कमी जागा मिळाल्याने ते पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. आता अखेर भाजपने नितीशकुमार यांचेच नाव पुढे केले आहे. 

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री राहतील, असे स्पष्ट केले आहे. भाजप आणि जेडीयूच्या जागांमधील फरकाचा कोणताही परिणाम राज्यातील सत्तासमीकरणावर होणार नाही, असे दिसत आहे.  

भाजपने दिवंगत रामविलास पासवान यांचा राजकीय वारसा संपवल्याचा आरोप दिग्विजयसिंहांनी केला. त्याचवेळी भाजपने कुटनितीचे राजकारण करत मुख्यमंत्री नितीशकुमार यांची राजकीय उंची कमी करण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी म्हटले आहे. 

दिग्विजयसिंह यांनी ट्विट करत म्हटले की, नितीशकुमारजी बिहार तुमच्यासाठी लहान झाला आहे. तुम्ही राष्ट्रीय राजकारणात जायला हवे. धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर विश्‍वास ठेवणाऱ्या लोकांना मदत करा. इंग्रजांप्रमाणे फूट पाडा आणि राजकारण करा, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणाला थारा देऊ नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे. 

दिग्विजयसिंह यांनी राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या चांगल्या कामगिरीबद्धल अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत. दिग्विजसिंह म्हणाले की, आज देशात विचारसरणीच्या आधारे संघर्ष करणारे राहुल गांधी हे एकमेव नेते आहेत. राजकारण विचारातून केले जाते, हे एनडीएच्या घटक पक्षांनी समजून घेतले पाहिजे. एखादी व्यक्ती जर राजकीय महत्त्वकांक्षेपोटी विचारांना तिलांजली देऊन आपल्या स्वार्थासाठी तडजोडी करत असेल तर ती अधिक काळ राजकारणात टिकत नाही. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख