तेजस्वी सूर्यांची तातडीने हकालपट्टी करा; संतप्त शिवकुमारांनी भाजपला सुनावले - congress leader d k shivakumar says bjp should sack mp tejasvi surya | Politics Marathi News - Sarkarnama

तेजस्वी सूर्यांची तातडीने हकालपट्टी करा; संतप्त शिवकुमारांनी भाजपला सुनावले

वृत्तसंस्था
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

कर्नाटकातील खासदार तेजस्वी सूर्या यांनी राज्यातील भाजपच्या सरकारला घरचा आहेर दिला आहे. सूर्या यांच्या विरोधात आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. 
 

बंगळूर : बंगळूर हे दहशतवादी कारवायांचे केंद्रस्थान बनले आहे, असा धक्कादायक आरोप भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी केला आहे. सूर्या यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली असून, त्यानंतर त्यांनी स्वत:च्या पक्षाच्या सरकारविरोधात वक्तव्य केले आहे. या प्रकरणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही साकडे घातले आहे. आता त्यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी या प्रकरणी भाजपला धारेवर धरले आहे.  

सूर्या हे दक्षिण बंगळूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. भाजयुमोच्या अध्यक्षपदी सूर्या यांची नुकतीच निवड करुन त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपविली आहे. मात्र, सूर्या यांनी राज्यातील भाजप सरकारविरोधातच मोहीम उघडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सूर्या यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाल्यानंतर मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी या प्रकरणात सूर्या यांची पाठराखण केली आहे. याबद्दल भाजप नेते खासगीत नाराजी व्यक्त करीत आहेत. आपलाच खासदार राज्य सरकारची प्रतिमा मलिन करीत आहे, अशी खंत काही नेते व्यक्त करीत आहेत.  

सूर्या यांनी नुकतीच अमित शहा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) सुसज्ज आणि पुरेसे मनुष्यबळ असलेले कार्यालय कर्नाटकमध्ये सुरू करावे, अशी मागणी त्यांनी या भेटीत केली. याविषयी बोलताना सूर्या म्हणाले की, भारतातील सिलिकॉन व्हॅली अशी ओळख असलेल्या बंगळूरमध्ये मागील काही काळात अनेक दहशतवादी कारवाया उघडकीस आल्या आहेत. दहशतवादी गट त्यांच्या कारवायांसाठी बंगळूर शहराचा वापर करीत आहेत. शहरात अनेक स्लीपर सेल तपास यंत्रणांना उध्वस्त केले आहेत. 

गृहमंत्री अमित शहा यांनी लवकरात लवकर एनआयएचे कायमस्वरुपी कार्यालय राज्यात सुरू करण्यात येईल, असे म्हटले आहे. या कार्यालयात पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी नेमण्याचेही शहा यांनी सांगितले आहे. डी जे हळ्ळी आणि के.जी. हळ्ळी येथील हिंसाचाराच्या  घटनांची चौकशी एनआयएने केली आहे. या तपासात दहशतवादी गट शहराचा वापर कारवायांसाठी करीत असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती सूर्या यांनी दिली. 

काँग्रेस आमदार आर. अखंड श्रीनिवास मूर्ती यांचे घर, त्यांची बहीण जयंती यांचे घर आणि डी जे हळ्ळी व के जी हळ्ळी पोलीस ठाण्यांना जमावाने 11 ऑगस्टला आग लावली होती. सुमारे तीन हजारहून अधिक जणांच्या हिंसक जमावाने ही जाळपोळ केली होती. आमदार मूर्ती यांच्या भाच्याने सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकल्याप्रकरणी हा जमाव हिंसक बनला होता. याला धार्मिक दंगलीचे स्वरुप देण्यात आले होते. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. आता सूर्या यांनीही याचाच उल्लेख केला आहे. 

सूर्या यांनी केलेल्या विधानावर सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणात लक्ष्य होऊ लागले आहेत. सूर्या यांनी बंगळूरची बदनामी केल्याचा आरोप करीत काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले की, सूर्या यांची भाजपने तातडीने हकालपट्टी करावी. ते बंगळूरची बदनामी करीत आहेत. सूर्या हे राज्यासाठी आणि भाजपसाठी अपमानजनक ठरले आहेत.  विकासदराची घसरण सुरू असून अशा प्रकारच्या विधानांमुळे कोणता गुंतवणूकदार बंगळूर आणि कर्नाटकमध्ये येईल? आता याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी द्यायला हवे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख