Congress leader claims Jyotirditya Scindia offered him Rs 50 cr to switch sides
Congress leader claims Jyotirditya Scindia offered him Rs 50 cr to switch sides

भाजपकडून मला 50 कोटींची ऑफर; काँग्रेस नेत्याचा दावा

विधानसभा पोटनिवडणुकांमुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात प्रचाराला जोर चढला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

भोपाळ : मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांचा प्रचार शिगेला पोचला आहे. सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस असा जोरदार सामना रंगला आहे. भाजप आणि काँग्रेससाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक असली तरी जोतिरादित्य शिंदे यांच्यासाठी हा अस्तित्वाचा लढा ठरणार आहे. आता एका काँग्रेस नेत्याने शिंदे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. शिंदे यांनी भाजपमध्ये येण्यासाठी 50 कोटी रुपयांसह मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा दावा केला आहे. 

मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर व चंबळ या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. 

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणुका होत आहे. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

माजी मंत्री व काँग्रेस नेते उमंग सिंगहार यांनी भाजपकडून ऑफर आल्याचा दावा केला आहे. जोतिरादित्य शिंदे यांनी मला 50 कोटी रुपयांची ऑफर देऊन भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. याचबरोबर मंत्रिपद देण्याचे आश्वासनही त्यांनी मला दिले होते, असे सिंगहार यांनी म्हटले आहे. मार्चमध्ये झालेल्या सत्तांतरावेळी भाजपने काँग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी 35 कोटी रुपये देऊन खरेदी केले, असा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर सिंगहार यांच्या दाव्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

मार्चमधील सत्तानाट्यावेळी काँग्रेसचे आमदार बंगळूरमध्ये होते. त्यावेळी शिंदे यांनी माझ्याशी चर्चा केली होती. त्यांनी मला काँग्रेसमध्ये भवितव्य नसल्याचे म्हटले होते. भाजपमध्ये आल्यास 50 कोटी आणि मंत्रिपद देऊ अशी ऑफरही त्यांनी दिली होती, असे सिंगहार यांनी म्हटले आहे. 

राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपला केवळ 9 जागा हव्या आहेत. काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पोटनिवडणुकीतील सगळ्या जागा जिंकाव्या लागतील. यानंतर राजकीय समीकरणे बदलू शकतात. जोतिरादित्य शिंदे यांच्यावर आता मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. कारण त्यांच्यासोबत काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या 22 आमदारांना पुन्हा निवडून आणण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर आहे. 

जोतिरादित्य यांच्या ग्वाल्हेर आणि चंबळ या भागातील तब्बल 16 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. शिंदे परिवाराचा बालेकिल्ला असलेल्या या भागात आपले वर्चस्व आहे हे शिंदे यांना आता प्रत्यक्ष सिद्ध करावे लागेल. याचमुळे शिंदे या भागातील प्रचार सभांमध्ये बोलताना ही निवडणूक केवळ काँग्रेस आणि भाजपच्या प्रतिष्ठेची नसून, ग्वाल्हेर आणि चंबळच्या प्रतिष्ठेची असल्याचे म्हणत आहेत. शिंदे यांना येथे केवळ काँग्रेसचे आव्हान नसून, बहुजन समाज पक्षही मैदानात आहे. यामुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com