गेहलोत अन् पायलट यांच्यासाठी उद्याचा दिवस महत्वाचा!

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद कायम आहे.
गेहलोत अन् पायलट यांच्यासाठी उद्याचा दिवस महत्वाचा!
congress leader ajay maken will talk gehlot and pilot camp

नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद कायम आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वादावर तोडगा काढण्यासाठी पक्षाचे राजस्थान प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस अजय माकन हे उद्या (ता.6) दाखल होत आहेत. गेहलोत आणि पायलट गटाशी संवाद ते साधणार असून, त्यांच्या या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

जयपूरमधील काँग्रेसच्या कार्यालयात माकन हे उद्या पदाधिकारी आणि गेहलोत व पायलट गटाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. मागील काही दिवसांपासून गेहलोत आणि पाललट गटामध्ये संघर्ष वाढला आहे. काही दिवसांपूर्वी सचिन पायलट हे दिल्लीतही गेले होते. त्यांनी केलेल्या मागण्यांवर वर्षभरानंतरही पक्षाने निर्णय न घेतल्याने ते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर माकन हे उद्या राज्यात  दाखल होणार असून, त्यांची बैठक महत्वाची ठरणार आहे. पायलट समर्थकांना पक्ष संघटनेत आणि सरकारमध्ये स्थान देण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. 

काँग्रेस हाय कमांडला भेटण्यासाठी पायलट गटाचे 15 नेते दिल्लीत दाखल झाले होते. त्यांनी याआधी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिले होते. राज्यातील काँग्रेसच्या सरकारमध्ये बहुजन समाज पक्षातून काँग्रेसमध्ये आलेले नेते आणि अपक्ष आमदारांचे वर्चस्व वाढत असून, काँग्रेसचे नुकसान होत आहे. बाहेरुन आलेले आमदार आणि अपक्ष आमदार पक्षाला कमकुवत करीत आहेत, असा मुद्दा त्यांनी पत्रात मांडला होता. हे सर्व नेते पायलट गटाचे असून, बहुजन समाज पक्षातून काँग्रेसमध्ये आलेले आमदार आणि अपक्ष आमदार हे गेहलोत गटाचे आहेत. आता गेहलोत गटाच्या या आमदारांपासून पक्षाला वाचवा, अशी मागणी या नेत्यांनी केली होती. 

पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली होती. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा याला विरोध आहे. राजस्थानमधील सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे.

पायलट यांनी बंड केले त्यावेळी साथ देणाऱ्या अपक्ष व इतर आमदारांना डावलता येणार नाही, असे गेहलोत यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे. हा आता वादाचा मुद्दा बनला आहे. मागील वर्षीही पक्षाच्या विरोधात बंड करुन पायलट दिल्लीत दाखल झाले होते. यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात आले होते. आता त्यांची मागणी मान्य केल्यास याची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती पक्षाला वाटत आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in