काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची भररस्त्यातच तरुणींकडून चपलेने धुलाई - congress jalaun district president thrashed by two woman in uttar pradesh | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची भररस्त्यातच तरुणींकडून चपलेने धुलाई

वृत्तसंस्था
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना भररस्त्यात मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

जालौन : येथील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हाध्यक्ष अनुज मिश्रा यांना दोन तरुणी भररस्त्यात चपलेने मारहाण करीत असल्याचा हा व्हिडीओ आहे. मिश्रा हे वारंवार छेड काढत असल्याने अखेर संतापून त्यांना मारहाण केल्याचे संबधित तरुणींनी म्हटले आहे. या प्रकरणी आता पोलिसांनीही कारवाईची पावले उचलली आहे. या प्रकरणी काँग्रेसनेही तातडीने चौकशी समिती नेमली आहे. 

उत्तर प्रदेशातील या घटनेची चर्चा आता देशभरात होऊ लागली आहे. जालौन जिल्ह्यातील उरई रेल्वे स्थानकासमोर ही घटना घडली आहे. तरुणींना कॉल करुन मिश्रा यांना बोलावून घेतले. ते तेथे आल्यानंतर त्यांना चपलेने मारहाण केली. या वेळी मिश्रा हे त्या तरुणींसमोर सोडून देण्यासाठी हात जोडून गयावया करीत होते. परंतु, त्यांनी मिश्रा यांना मारहाण सुरूच ठेवली होती.  या वेळी जमलेल्या बघ्यांपैकी कुणीतरी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ काढून तो व्हायरल केला आहे.  

संबंधित तरुणींनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनुज मिश्रा मागील काही महिन्यांपासून कॉल करुन त्यांच्याशी अश्लील बोलत होते. ते अनेक दिवसांपासून आमचा लैंगिक छळ करीत होते. याची तक्रार आम्ही उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांच्याकडेही केली होती. मात्र, यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. 

आता या प्रकरणाची दखल पोलिसांनीही घेतली आहे. जालौनचे पोलीस अधीक्षक डॉ. यशवीरसिंह यांनी म्हटले आहे की, अनुज मिश्रा हे  लैंगिक छळ करीत असल्याने दोन तरुणींनी त्यांना उरई रेल्वे स्थानकासमोर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणी कारवाई करण्याची पावले पोलिसांकडून उचलण्यात येतील.   

काँग्रेसनेही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तातडीने समिती स्थापन केली आहे. ही समिती या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन आपला अहवाल पक्ष नेतृत्वाला सादर करेल. या समितीत माजी केंद्रीय मंत्री प्रदीप जैन, उत्तर प्रदेशचे काँग्रेस सरचिटणीस राहुल राय, महिला काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा पाल, उत्तर प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष शिवनारायणसिंह आणि रंजन पांडेय यांचा समावेश आहे.  संबंधित तरुणींपैकी एक काँग्रेसची जिल्हा सरचिटणीस आहे. या घटनेनंतर तिला पदावरुन हटवण्यात आल्याचे समजते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख