हाय कमांडने गेहलोत गटाच्या नाड्या आवळल्याने पायलट गट जोशात - congress high command entry in ashok gehlot and sachin pilot tussle | Politics Marathi News - Sarkarnama

हाय कमांडने गेहलोत गटाच्या नाड्या आवळल्याने पायलट गट जोशात

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जुलै 2021

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या वादात आता हाय कमांडची एंट्री झाली आहे. 

 

नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या वादात आता हाय कमांडची एंट्री झाली आहे. काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाने जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी जिल्हा प्रभारींकडून नावे मागवली आहेत. गेहलोत हे मुख्यमंत्री बनल्यानंतर पहिल्यांदाच असे घडले आहे. यामुळे हा गेहलोत गटाला मोठा धक्का मानला जात आहे. 

राज्यात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी पक्ष नेतृत्वाने थेट जिल्हा प्रभारींकडून तीन नावे मागवली आहेत. यात नेतृत्वाने प्रदेश काँग्रेसला डावलले आहे. नेतृत्वाने थेट जिल्हाध्यक्षांच्या निवडणुकीत लक्ष घातल्याने काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. 

गेहलोत हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून पहिल्यांदाच पक्ष नेतृत्वाने प्रदेश काँग्रेसला डावलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गेहलोत गटाला मोठा झटका बसला आहे. याचवेळी पायलट गटात मात्र उत्साह संचारला आहे. गेहलोत यांची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी पक्ष नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे, असे पायलट गटाचे म्हणणे आहे. आता पक्ष संघटना आणि सरकारमध्ये आपल्याला अधिक स्थान मिळेल, अशी आशा पायलट गट व्यक्त करीत आहे. 

सचिन पायलट यांनी मागील वर्षी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन बंड केले होते. त्यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदी सोडावे लागले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी गोविंदसिंह दोस्तारा यांची निवड झाली. परंतु, गेहलोत आणि पायलट यांच्या वादात जिल्हाध्यक्षांच्या निवडी तशाच राहिल्या आहेत. त्यामुळे यात आता थेट पक्ष नेतृत्वाने लक्ष घातले आहे.  

हेही वाचा : प्रियांका गांधींनी मनधरणी केल्यानंतर अखेर राहुल गांधींनी होकार कळवला! 

पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली होती. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा याला विरोध आहे. राजस्थानमधील सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे.

पायलट यांनी बंड केले त्यावेळी साथ देणाऱ्या अपक्ष व इतर आमदारांना डावलता येणार नाही, असे गेहलोत यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे. हा आता वादाचा मुद्दा बनला आहे. मागील वर्षीही पक्षाच्या विरोधात बंड करुन पायलट दिल्लीत दाखल झाले होते. यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात आले होते. आता त्यांची मागणी मान्य केल्यास याची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती पक्षाला वाटत आहे. 

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मागील वर्षी पायलट यांच्यासह त्यांच्या 18 समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती. पण ही आश्वासनं अद्याप पूर्ण न झाल्यानं पायलट यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पायलट यांच्या भाजप प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख