बिहारमध्ये पत्रकार रवीशकुमार यांचे बंधू विधानसभेच्या आखाड्यात..!

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
congress gave ticket to ravish kumars brother brajesh kumar pandey in bihar
congress gave ticket to ravish kumars brother brajesh kumar pandey in bihar

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात सर्वांत आश्चर्यचकित करणारे नाव ब्रजेश कुमार पांडे यांचे आहे. ब्रजेश हे ज्येष्ठ पत्रकार रवीशकुमार यांचे बंधू आहेत. ब्रजेश यांना तिकिट मिळाल्यावरुन रवीश यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. 

ब्रजेश पांडे यांना मोतिहारीतील गोविंदगंज मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. ब्रजेश हे काँग्रेसचे आधी प्रदेश उपाध्यक्षही होते. एका तरुणीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्याने ते अडचणीत आले होते. त्यांच्यावर हा आरोप झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी रवीशकुमार यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. 

याआधी 2015 मध्ये ब्रजेश हे काँग्रेसकडूनच गोविंदगंजमधून रिंगणात उतरले होते. मात्र, त्यावेळी त्यांचा लोक जनशक्ती पक्षाचे राजू तिवारी यांनी पराभव केला होता. मागील विधानसभा निवडणुकीत ब्रजेश यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे दीड कोटी रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता असून, साडेतीन लाखांचे कर्ज आहे. आता गोविंदगंद मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. 

ब्रजेश यांनी काँग्रेसने उमेदवारी दिल्याचे जाहीर होताच सोशल मीडियावर रवीशकुमार यांना ट्रोल करण्यास सुरुवात झाली. याचबरोबर ब्रजेश यांचा राहुल गांधी यांच्यासोबतचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याआधी अनेक वेळा ब्रजेश यांच्यावरुन रवीश यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. याचवेळी एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com