बिहारमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले डॉ. मसकूर उस्मानी आहेत तरी कोण? - Congress gave ticket to Maskoor Ahmad Usmani from Jale constituency | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले डॉ. मसकूर उस्मानी आहेत तरी कोण?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात डॉ.मसकूर अहमद उस्मानी हे उतरले आहेत. यावरुन मोठा वादंग बिहारच्या राजकारणात सुरू झाला आहे.

पाटणा : बिहारमध्ये जाले मतदारसंघात डॉ. मसकूर अहमद उस्मानी यांना काँग्रेसने तिकिट दिल्याने मोठा वादंग सुरू झाला आहे. कायम वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या उस्मानी यांना देशद्रोही आणि जिनासमर्थक ठरवले जात आहे. उस्मानी यांना उमेदवारी दिल्यावरुन काँग्रेसला विरोधकांसह स्वपक्षातील नेत्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहेत. 

अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष असलेल्या उस्मानी यांच्या उमेदवारीने बिहारमधील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. उस्मानी हे दरभंगा जिल्ह्यातील आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नागरिक नोंदणी सूची यांच्याविरोधातील आंदोलनात ते अग्रभागी होते. अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी स्टु़डंट्स युनियनच्या अध्यक्षपदी त्यांची डिसेंबर 2017 मध्ये निवड झाली होती. त्यांनी अजयसिंह यांचा 6 हजार 719 मतांनी पराभव केला होता. 

उस्मामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा 2019 मध्ये दाखल झाला होता. त्यांनी देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचबरोबर सफूरा झरगर आणि मीरन हैदर यांच्या अटकेबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याचा ठपका ठेवत ट्विटरवने त्यांचे अकाउंट चालू वर्षात तात्पुरते  बंद केले होते. उस्मानी यांच्या उमेदवारीनंतर राज्यात मोठा गदारोळ उडाला आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. याचबरोबर स्वपक्षातील नेतेही उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख