
जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्यासमोर अडचणी वाढत चालल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. तसेच पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. पण त्याआधीच आमदार, मंत्र्यांची नाराजी समोर येऊ लागली आहे. मागील चार दिवसांत चार आमदारांनी सरकारविरोधातच शड्डू ठोकला आहे. (Congress Latest Marathi News)
राजस्थानचे (Rajasthan) क्रीडा व युवक कल्याण मंत्री अशोक चांदना यांनी आपल्याला पदावरून मुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यांनी गुरूवारी याबाबतचे ट्विट केले आहे. राज्याचे प्रधान सचिव कुलदीप रांका यांच्यावर ते नाराज असल्याचे यातून स्पष्ट झालं आहे. आपल्याला मंत्रिपदावरून मुक्त करत रांका यांच्याकडेच सर्व विभागांचा कारभार द्यावा, अशा संतापलेल्या स्वरात त्यांनी हे ट्विट केलं आहे.
चांदना यांच्याआधी तीन आमदारांनीही पक्षासह सरकारवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. डूंगरपुर येथील आमदार आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश घोघरा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तर आमदार राजेंद्र विधूडी आणि रामलाल मीणा यांनी पक्ष व सरकारविरोधी वक्तव्य केली आहेत. गुरूवारी अशोक चांदना यांच्या ट्विटमुळे सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, चांदना यांच्या ट्विटवर बोलताना पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह यांनी सारवासारव केली आहे. चांदना यांचे वक्तव्य आवेशात दिलेले दिसते. ते माझ्या लहान भावासारखे आहे. त्यांच्याशी बोलून समजवले जाईल. या गोष्टीकडे राजकीय दृष्टीकोनात पाहता कामा नये, असं सिंह यांनी सांगितले.
चांदना यांनी काय म्हटलं आहे?
'माननीय मुख्यमंत्रीजी, माझी आपल्याकडे वैयक्तिक मागणी आहे की, मला या अपमानास्पद मंत्रिपदावरून मुक्त करा. माझ्याकडील सर्व विभागांचा पदभार कुलदीप रांका यांच्याकडे द्यावा. कारण तसंही तेच सर्व विभागांचे मंत्री आहेत,' अशा शब्दांत चांदना यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
चाँदना यांच्या ट्विटनंतर भाजपने टोला लगावला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतिश पुनिया यांनी ट्विट करत आता जहाज बुडत आहे 2023 चे निकाल येण्यास सुरूवात झाली आहे, असं म्हटलं आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील नाराजी उफाळून येत असल्याने पक्षासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.