आईये महाराज, हम दोनोही बिकाऊ है! काँग्रेसचा जोतिरादित्य शिंदेंवर निशाणा - congress compares civil aviation minister jyotirditya scindia to air india | Politics Marathi News - Sarkarnama

आईये महाराज, हम दोनोही बिकाऊ है! काँग्रेसचा जोतिरादित्य शिंदेंवर निशाणा

वृत्तसंस्था
शनिवार, 10 जुलै 2021

मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार पाडून कमळ फुलवणारे जोतिरादित्य शिंदे यांना नागरी हवाई वाहतूक मंत्रालय देण्यात आले आहे. 
 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) नुकताच मेगाविस्तार झाला. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार पाडून कमळ फुलवणारे जोतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांना कॅबिनेट मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले. त्यांना नागरी हवाई वाहतूक मंत्रालय देण्यात आले आहे. यावरुन काँग्रेसने जोतिरादित्य शिंदेंवर निशाणा साधला आहे. 

शिंदे यांनी 22 समर्थक आमदारांसह मागील वर्षी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. नंतर शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार राज्यात सत्तेत आले. त्यावेळी त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले होते. राज्यात सत्तांतर घडवणाऱ्या जोतिरादित्य शिंदेंना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यांच्याकडे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहे. 

देशातील सरकारी विमान कंपनी एअर इंडिया विकण्याची प्रक्रिया सुरू आहे. जोतिरादित्य शिंदे यांच्याकडील नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडिया हा धागा पकडून काँग्रेसने निशाणा साधला आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी जोतिरादित्य शिंदे आणि एअर इंडियाची तुलना केली आहे. एअर इंडियालाही महाराजा असे म्हटले जाते. त्यांनी दोन्ही महाराजा विक्रीसाठी आहेत, असा खोचक टोमणा मारला आहे. रबने बना दी जोडी, असेही त्यांनी म्हटले आहे. 

यावर भाजप नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, यातून काँग्रेस किती हताश आहे हे समोर आले आहे. जोतिरादित्य शिंदे यांच्यासारख्या युवा नेत्याला लक्ष्य करुन विरोधी पक्षाचे चुकीचे शब्द वापरले आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामिनावर बाहेर सुटलेल्या लोकांकडून अशा प्रकारचे काम सुरू आहे. 

हेही वाचा : येतोय कायदा नवीन कायदा...हम दो, हमारे दो अन्यथा सरकारी नोकरीसह निवडणूक लढण्यासही मुकाल

फेसबुक अकाउटं झालं होतं हॅक 
जोतिरादित्य शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासांनी त्यांच्या फेसबुक उकाउंटवर ते काँग्रेसचे कौतुक करीत असलेला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. याचबरोबर या व्हिडीओत ते मोदींवर टीका करीत असल्याचे दिसत होते. यावरुन मोठी खळबळ उडाली होती. अखेर शिंदे यांच्या आयटी टीमने याबाबत फेसबुककडे आक्षेप नोंदवला. त्यानंतर त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख