बिहारमध्ये काहीही होऊ शकतं...ईव्हीएमच्या संरक्षणासाठी काँग्रेसची फौज!

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. या निवडणुकीत तेजस्वी यादव हे सत्तास्थापना करतील, असे अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात येत आहेत.
Congress asks its leaders to man strongrooms for EVM protection
Congress asks its leaders to man strongrooms for EVM protection

पाटणा : बिहारमध्ये सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) - भाजपची राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) - काँग्रेसच्या महाआघाडीत सत्तेसाठी रस्सीखेच राहणार आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे पारडे जड दिसत आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांकडून मतमोजणीत गैरप्रकार होण्याची भीती काँग्रेसला वाटत आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरुमवर पहारा देण्याच्या सूचना काँग्रेसने नेत्यांना दिल्या आहेत. 

एक्झिट पोलमध्ये महाआघाडीच्या विजयाचे भाकित करण्यात आल्याने काँग्रेसने आधीपासून सावध पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. यासाठी काँग्रेसने वरिष्ठ नेत्यांना बिहारमध्ये पाठवले आहे. यात पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला आणि अविनाश पांडे यांचा समावेश आहे. त्यांच्यावर सहकारी पक्षांशी योग्य समन्वय साधणे आणि आपले आमदार एकत्र ठेवण्याची जबाबदारी आहे. याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय, झारखंडचे मंत्री बन्ना गुप्ता, राजस्थानमधील मंत्री राजेंद्र यादव व रघु शर्मा, पंजाबमधील आमदार गुरकिर्तसिंग कोटली आदी नेते बिहारमध्ये दाखल झाले आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील 38 जिल्ह्यांत ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरुमबाहेर काँग्रेसच्या नेत्यांचा पहारा असेल. ईव्हीएमचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांकडून जिंकण्यासाठी काही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेसचे नेते 24 तास ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी पहारा देतील. याचबरोबर काँग्रेसच्या निवडून आलेल्या आमदारांना विरोधक फोडू नयेत यासाठीही पावले उचलण्यात आली आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी काही नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.  

टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार, आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीला मोठे यश मिळेल. महाआघाडीतील आरजेडी 180, काँग्रेस 11 जागा आणि एनडीएतील भाजप 55 आणि जेडीयू 11 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इतर पक्षांना 8 आणि अपक्षांना 4 जागा मिळतील, असेही म्हटले आहे. 

ईटीजीच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 114, महाआघाडीला 120, लोक जनशक्ती पक्षाला 3 आणि इतरांना 6 जागा मिळतील. टीव्ही 9 भारतवर्षच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 115, महाआघाडीला 120, लोक जनशक्ती पक्ष 4 आणि इतरांना 4 जागा मिळतील. 

इंडिया टु़डे - माय अॅक्सिस एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत तेजस्वी यादव हे आघाडीवर आहेत. तेजस्वी यादव यांना 44 टक्के, नितीशकुमार यांना 35 टक्के आणि चिराग पासवान यांना 7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. जनतेकडून मुख्यमंत्रिपदासाठी तेजस्वी यादव यांनाच पसंती असल्याचे म्हटले आहे. 

टाईम्स नाऊ - सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 116 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याचवेळी महाआघाडीला 120 जागा मिळतील, असे म्हटले आहे. लोक जनशक्ती पक्षाला केवळ एक जागा मिळेल असे म्हटले असून, इतरांना सहा जागा मिळतील. 

रिपब्लिक टीव्ही जन की बातच्या एक्झिट पोलनुसार आरजेडीला बिहारमध्ये सर्वाधिक जागा मिळतील. एनडीएला 91 ते 117, महाआघाडीला 118-138, लोक जनशक्ती पक्ष 5 ते 8 आणि इतरांना 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिहारच्या विधानसभेचे संख्याबळ 243 असून, बहुमतासाठी 122 जागा आवश्यक आहेत. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा 3 नोव्हेंबरला झाला असून, यात ९४ मतदारसंघ होत. तिसरा टप्पा आज झालाअसून, यात ७८ मतदारसंघ होते. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com