कंगनाच्या अडचणीत वाढ...न्यायालयात आणखी एक तक्रार दाखल - Complaint against Kangana Ranaut in andheri court for spreading hate | Politics Marathi News - Sarkarnama

कंगनाच्या अडचणीत वाढ...न्यायालयात आणखी एक तक्रार दाखल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन सुरू असलेला गदारोळ अद्याप शमलेला नाही. आता या प्रकरणी तिच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. 

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वादग्रस्त वक्तव्यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. त्यानंतरही कंगनाने वादग्रस्त वक्तव्ये करणे सुरूच ठेवले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडोली यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. कंगनाविरोधात आणखी एक तक्रार न्यायालयात दाखल झाली आहे. 

कंगनाने समाजात तेढ पसरवणारे वक्तव्य केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध वांद्य्रातील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तापस करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. याआधी सुशांतसिंह प्रकरणात कंगनाने मुंबई पोलिसांना लक्ष्य केले होते. आता तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन चौकशीचे आदेश न्यायालयानेच मुंबई पोलिसांना दिल्याने कंगना चांगलीच अडचणीत आली आहे. 

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यात देशद्रोहाचा गुन्हाही त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. यामुळे कंगना चांगलीच अडचणीत आल्याचे मानले जात आहे. कंगना आणि रंगोली यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यांना तपास अधिकाऱ्यांसमोर येत्या सोमवारी (ता.26) आणि मंगळवारी (ता.27) हजर राहण्यास सांगण्यता आले आहे. यामुळे कंगनाची चौकशी सोमवारपासून सुरू होणार आहे. या चौकशीसाठी कंगनाला शिमल्यातून मुंबईत परतावे लागणार आहे. 

आता कंगनाच्या विरोधात अंधेरीतील न्यायालयात तक्रार करण्यात आली आहे. वकील अली काशिफ खान देशमुख यांनी ही तक्रार केली आहे. यावर 10 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, कंगनाने समाजात तेढ पसरवणारी वक्तव्ये केली आहेत. चिथावणीखोर वक्तव्ये करुन तिने देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण केला आहे. कंगनाने केवळ महाराष्ट्र पोलीस आणि सरकारला लक्ष्य केले नाही तर देशातील दोन समुदायांमध्ये शत्रूत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे सगळे तिने राजकीय फायद्यासाठी केले आहे. 

या तक्रारीसोबत कंगनाने केलेली अनेक ट्विटही सादर करण्यात आली आहेत. यात कंगनाने राजकारणी, महाराष्ट्र पोलीस आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींबाबत केलेल्या ट्विटचा समावेश आहे. या प्रकरणी देशमुख यांनी अंधेरी पोलीस ठाण्यातही तक्रार दिली होती. कंगनाविरोधात एफआयआर दाखल करावा, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली होती. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख