उद्योगमंत्र्यांनी जनसुनावणीतच केली तहसीलदारांची पोलखोल

मी सहावेळा आमदार आणि तीनवेळा मंत्री झालो आहे. अनेक तहसीलदार आणि नायब तहसीलदारांची नियुक्ती केली आहे, असंही मंत्री म्हणाले.
Common practice among Tehsil officers taking 2 percent bribe
Common practice among Tehsil officers taking 2 percent bribe

कोटा : देशात भ्रष्टाचाराची (Corruption) पाळेमुळे खोलवर रूजली असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळतं. ग्रामपंचायतींपासून मंत्रालयांपर्यंत अनेकांना आपली कामे होण्यासाठी लाच द्यावी लागत असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. आता उद्योग मंत्र्यांनीही याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. देशभरातील तहसीलदार, नायब तहसीलदार आणि तलाठी सर्सासपणे दोन टक्के लाच घेत असल्याचा खळबळजनक दावा उद्योगमंत्र्यांनीच केला आहे. या वक्तव्यामुळं वाद निर्माण झाला असून विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. (Common practice among Tehsil officers taking 2 percent bribe)

राजस्थानचे उद्योग मंत्री प्रसादी लाल मीना (Prasadi Lal Meena) यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते राजस्थानातील बुंदी जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. तेथील एका जनसुनावणीवेळी बोलताना त्यांनी हा दावा केला. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य सत्येश शर्मा यांनी यांनी तहसीलदार प्रितम कुमारी मीना यांच्या नियुक्तीचा आदेश प्रलंबित असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित केला. तसेच त्या अत्यंत प्रामाणिक अधिकारी असल्याचंही ते म्हणाले. 

शर्मा यांना उत्तर देताना मंत्री म्हणाले, भारतात कुठेही प्रामाणिक तहसीलदार, नायब तहसीलदार आणि तलाठी सापडणार नाही. मी सहावेळा आमदार आणि तीनवेळा मंत्री झालो आहे. अनेक तहसीलदार आणि नायब तहसीलदारांची नियुक्ती केली आहे. ते सर्रासपणे दोन टक्के लाच घेतात, असं मीना म्हणाले. दरम्यान, जागतिक भ्रष्टाचार क्रमवारीत भारत 180 देशांमध्ये 86 व्या क्रमांकावर आहे. 

मीना यांना अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व बदल्यांवरून पक्षातूनच विरोध होत आहे. बुंदी जिल्ह्याचे अध्यक्ष देवराज कोचर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आशिष गुप्ता यांच्याविरोधातील तक्रार मंत्र्यांनी ऐकून घेतली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात आंदोलन करून घोषणा देण्यात आल्या. मीना यांना पुन्हा जिल्ह्यात येऊ देणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यावर मीना यांनी आपण दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ असं वक्तव्य केलं. 

महिलांच्या स्वच्छातगृहात गेले होते मंत्री

उद्योग मंत्री प्रसादी लाल मीना हे काही महिन्यांपूर्वी महिलांच्या स्वच्छतागृहात घुसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मोठा वादही निर्माण झाला होता. भाजपने त्यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर त्यांनी याबाबत दिलगिरीही व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in