जयललितांच्या मृत्यूचं गूढ तब्बल पाच वर्षांनी उलगडणार

अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा व तमिनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूचे गूढ आताउलगडणार आहे.
committe probing jayalalithaa death may submit report in one month
committe probing jayalalithaa death may submit report in one month

नवी दिल्ली : अण्णाद्रमुकच्या (AIADMK) सर्वेसर्वा व तमिनाडूच्या (Tamil Nadu) माजी मुख्यमंत्री जयललिता (Jayalalithaa) यांच्या मृत्यूचे गूढ तब्बल पाच वर्षांनी उलगडण्याची शक्यता आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या आयोगानेच याबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) ही माहिती आज दिली. या प्रकरणातील केवळ 4 साक्षीदार तपासणे बाकी असून, महिनभरात संपूर्ण अहवाल न्यायालयासमोर सादर करू, असे आयोगाने म्हटले आहे. 

जयललितांचा मृत्यू 5 डिसेंबर 2016 रोजी झाला होता. त्यांच्यावर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात तब्बल 75 दिवस उपचार सुरू होते. नंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश ए.अरूमुगास्वामी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोग तमिळनाडू सरकारने सप्टेंबर 2017 मध्ये नेमला होता. या आयोगाने जयललिता यांच्या प्रकृती बिघडण्याच्या कारणांचा शोध घेतला असून, तब्बल 154 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. आता केवळ 4 साक्षीदारांचे जबाब बाकी असून, महिनाभरात चौकशी अहवाल सादर करण्याची तयारी आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दर्शवली. 

यानंतर अपोलो रुग्णालयाने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 26 एप्रिल 2019 रोजी आयोगाच्या चौकशीला स्थगिती दिली होती. नंतर तमिळनाडू सरकारने ही स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असून, यादरम्यान आयोगाने जयललितांच्या मृत्यूच्या चौकशीबाबत माहिती दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 सप्टेंबरला होणार आहे.  

तमिळनाडूतील मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अण्णाद्रमुककडून जयललिता यांच्या मृत्यूचा मुद्दा उकरून काढण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी जयललिता यांच्या मृत्यूला एम.के.स्टॅलिन जबाबदार असल्याचे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यावर स्टॅलिन यांनी थेट पलानीस्वामींना आव्हान दिले आहे. जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी माझ्या विरोधात न्यायालयात का जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. 

जयललिता यांची तब्बेत त्या मुख्यमंत्री असतानाच बिघडली होती. त्याबाबत त्यांनी काहीच सांगितले नाही. माझ्यावरील आरोप खरे असतील तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी कोणत्याही कायदेशीर कारवाईला तयार आहे, असे आव्हान स्टॅलिन यांनी दिले होते. तसेच सत्तेत आल्यानंतर जयललिता यांच्या मृत्यूचे गूढ उकलून काढू, असा इशाराही त्यांनी दिला होता. आता स्टॅलिन हे सत्तेत आले असून, त्यांच्या मृत्यूचे गूढ महिनाभरात उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com