भाजपमध्ये प्रवेशाचे आवाहन करणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला चक्क मुख्यमंत्री गेहलोत! - cm ashok gehlot attends book publication of governor karaj mishra | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

भाजपमध्ये प्रवेशाचे आवाहन करणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला चक्क मुख्यमंत्री गेहलोत!

वृत्तसंस्था
सोमवार, 5 जुलै 2021

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद कायम आहे. यातच आता गेहलोत यांनी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला हजेरी लावल्याने भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या पुस्तकात भाजपमध्ये प्रवेशासाठी आवाहन करण्यात आले आहे. 

राज्यपाल कलराज मिश्र यांच्या 'कलराज मित्र निमित्त मात्र हूँ मैं' पुस्तकाच्या प्रकाशनाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावल्याने नवा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. हे मिश्र यांचे आत्मचरित्र असले तरी याच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमत्री अमित शहांची छायाचित्रे आहेत. याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि माधवराव सदाशिव गोळवलकर यांचाही उल्लेख आहे. 

अशा पुस्तकाच्या प्रकाशनाला गेहलोत हे गेल्याने आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेहलोत हे अतिशय उत्साहाने राज्यपालांसमवेत या कार्यक्रमात सहभागी झालेले दिसले. या पुस्तकात वस्तू व सेवा कराचे समर्थन करण्यात आले असून, त्याचे फायदे मांडण्यात आले आहेत. काँग्रेसकडून पूर्वीपासून विरोध करीत असलेली विचारधारा आणि केंद्राचे आताचे निर्णय यांचे समर्थन करणारे हे पुस्तक आहे. आता काँग्रेसच्या मुख्यमंत्रीच या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. 

या पुस्तकात मोदी आणि शहा यांची छायाचित्रे आहेत. नव्या भारताच्या निर्माणासाठी आमच्या आंदोलनाला प्रतिसाद द्या. पक्षात प्रवेश करा आणि आमच्या मोहिमेला बळ द्या. एक भारत, श्रेष्ठ भारत, असा संदेश त्यांनी त्याखाली लिहिला आहे. थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आवाहन करणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहून गेहलोत यांनी त्यांच्यासमोरील अडचणी वाढवून घेतल्या आहेत. या कार्यक्रमाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हेसुद्धा उपस्थित होते.  

हेही वाचा : नवख्या आमदाराला मुख्यमंत्री केल्याने ज्येष्ठ नेते बंडाच्या पवित्र्यात 

पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली होती. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा याला विरोध आहे. राजस्थानमधील सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मागील वर्षी पायलट यांच्यासह त्यांच्या 18 समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती. पण ही आश्वासनं अद्याप पूर्ण न झाल्यानं पायलट यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पायलट यांच्या भाजप प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख