मोदींच्या 'हनुमाना'चा भव्य सीता मंदिराच्या निर्माणासाठी पुढाकार - Chirag Paswan to visit Sita temple and will proposes corridor between Ayodhya to Sithamarhi | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींच्या 'हनुमाना'चा भव्य सीता मंदिराच्या निर्माणासाठी पुढाकार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची प्रचाराचा धुरळा आता उडू लागला आहे. अयोध्येतील राम मंदिराचा निर्माणानंतर आता सीतामढीतील भव्य सीता मंदिराच्या निर्माणाचा मुद्दा समोर आला आहे.  

नवी दिल्ली : बिहारमध्ये प्रचाराला आता जोर चढला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट प्रचारात उडी घेतली आहे. मोदींना आज जाहीर सभेत बोलताना दिवंगत सहकारी रामविलास पासवान  यांच्या आठवणी जागवून जनभावनेला हात घातला होता. यानंतर पासवान यांचे पुत्र चिराग यांनी मोदींचे जाहीर आभार मानले होते. आता स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवून घेणारे चिराग हे सीतामढीला भेट देणार आहेत. तेथे भव्य मंदिराचे निर्माण करण्याचा प्रस्ताव ते मांडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. याचवेळी देश पातळीवर भाजपला पाठिंबा कायम राहील, अशी भूमिका एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी घेतली आहे. चिराग यांनी हे नितीशकुमार यांना लक्ष्य करीत आहेत. तरुणांच्या हाती सूत्रे मिळावीत अशी भूमिका घेतली त्यांनी आहे. 

चिराग पासवान हे स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवून घेत आहेत. ते 25 ऑक्टोबरला सीतामढीला भेट देणार आहेत. सीतेची जन्मभूमी असलेल्या सीतामढीत सीतेचे भव्य मंदिर उभारण्याचे आश्वासन चिराग यांनी दिले आहे. अयोध्येतील राम मंदिरानंतर आता सीतामढीत सीतेचे भव्य मंदिर उभारले जावे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. बिहारच्या ऐतिहासिक वारशाकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल ते नाराज आहेत. याचबरोबर सीतामातेशी राज्याच्या असलेल्या संबंधाकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे पासवान यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्या आणि सीतामढी या दोन पवित्र शहरांना जोडणारा धार्मिक कॉरिडॉर उभारण्याचा चिराग यांचा प्रस्ताव आहे. धार्मिक स्थळांचा विकास करुन या भागातील अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा त्यांचा मानस आहे. सीतामढी हे मिथिला विभागात आहे. बिहारच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या आधी चिराग यांची सीतामढी भेट नियोजित आहे. राज्यातील हिंदू मतदार आणि महिलांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बिहारमधील प्रचारात उडी घेतली. त्यांनी आज सासाराम, गया आणि भागलपूर येथे जाहीर सभा घेतल्या. या वेळी त्यांनी राज्यातील एनडीए सरकारचे कौतुक केले. मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाला लक्ष्य केले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहेत, असा दावा मोदींनी केला. 

मोदींनी आज भाषणात बिहारच्या दोन पुत्रांचा उल्लेख केला. यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मोदी म्हणाले की, बिहारने नुकतेच दोन पुत्र गमावले आहेत. मी रामविलास पासवान यांना आदरांजली अर्पण करतो. ते शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य गरीब आणि दलितांच्या कल्याणासाठी वाहिले. याचप्रकारे बाबू रघुवंशप्रसादसिंह यांनी गरीबांसाठी काम केले. मी त्यांनाही आदरांजली वाहतो. 

मोदींच्या भाषणानंतर चिराग पासवान हे भावुक झाले. त्यांनी ट्विटरवर भावनांना वाट मोकळी करुन दिली. ते म्हणाले की, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये येतात आणि पप्पांना एका खऱ्या साथीप्रमाणे श्रद्धांजली देतात. पप्पांसोबत शेवटच्या श्वासांपर्यंत होते, असे त्यांनी म्हटले असून, यामुळे मी भावुक झालो आहे. एक मुलगा म्हणून पप्पांबद्दल पंतप्रधानांचा हा स्नेह आणि सन्मान पाहून  मला खूप चांगले वाटले. पंतप्रधानांचे धन्यवाद! 

मोदींना आज पासवान यांचा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चिराग पासवान हे एनडीएमधून बाहेर पडले असले तरी ते मोदींचे गुणगाण गाताना थकत नसल्याचे चित्र आहे. याचवेळी मोदींनीही चिराग यांचे पिता रामविलास पासवान यांच्या आठवणी जागवल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. पासवान यांच्या निधनानंतर जनतेत असलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा व्हावा, असा उद्देश यामागे असल्याची चर्चा आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख