मुख्यमंत्र्यांनी मला तुरुंगात टाकावे; चिराग पासवानांचे थेट आव्हान

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यात आता सामना रंगला आहे.
chirag paswan says send me to jail and get my film probed
chirag paswan says send me to jail and get my film probed

पाटणा : मुख्यमंत्री नितीशकुमार यांना तुरुंगात पाठवण्याचा निर्धार  लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी केला आहे. यावर संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस  व बिहारचे मंत्री संजय कुमार झा यांनी चिराग यांना मदाऱ्याच्या माकडाची उपमा दिली होती. मदारी म्हणून त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. याला चिराग पासवान यांनी उत्तर दिले असून, मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आव्हान दिले आहे.  

झा हे नितीशकुमारांचे निकटवर्तीय मानले जातात. संजयकुमार झा म्हणाले होते की, मदाऱ्याचे माकड असते आणि त्याला नाचवत असतो मदारी. आता चिराग पासवान हे ते माकड बनले आहेत. त्यांनी कंगना राणावतसोबत अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. आता कंगना कुठे पोचली हे तुम्हीच पाहा. याचप्रमाणे सुशांतसिंह राजपूत याने कोणतीही पार्श्वभूमी नसताना बॉलीवू़डमध्ये स्वत:चा ठसा उमटवला. चिराग यांनी अभिनय केलेले चित्रपट मध्यंतरातून उठून जाण्यासारखे होते. आता निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर चिराग यांचीही अवस्था अशीच होईल. 

चिराग यांचा मदारी कोण असे विचारल्यावर झा म्हणाले की, ते सगळ्यांनाच माहीत आहे. बिहारमध्ये प्रथमच अशा प्रकारचे खालच्या पातळीवरील राजकारण होत आहे. नितीशकुमार यांची प्रतिमा स्वच्छ आहे. तुम्ही त्यांच्या कामाबद्दल जनतेसमोर प्रश्न विचारा. जनतेलाच यावर निर्णय घेऊ द्या. 

चिराग यांनी याला आज उत्तर दिले आहे. मोदींचा इशाऱ्यावर नाचणारे माकड असे म्हणून तुम्ही मोदींचा अपमान करीत आहात, असे चिराग यांनी म्हटले आहे. तुम्ही मला कारागृहात पाठवा आणि माझ्या चित्रपटाचीही चौकशी करा, असे आव्हानही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. माझा चित्रपट 2011 मध्ये आला होता. मागील नऊ वर्षांपासून माझ्याविरोधात कोणतीही कारवाई त्यांनी का केलेली नाही याचेही उत्तर द्यावे, असा सवालही त्यांनी केला. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये एकूण 243 विधानसभा मतदारसंघ आहेत. 

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. काँग्रेस बिहारमध्ये 70 जागा लढवत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी 28 ऑक्टोबरला बिहारमध्ये दोन सभा घेणार आहेत. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जेडीयूच्या विरोधात त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com