चिराग पासवान हे तर मदाऱ्याच्या इशाऱ्यावर नाचणारे माकड! - Chirag Paswan is Monkey dancing to someone else tunes says Bihar minister | Politics Marathi News - Sarkarnama

चिराग पासवान हे तर मदाऱ्याच्या इशाऱ्यावर नाचणारे माकड!

वृत्तसंस्था
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

चिराग पासवान हे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत आहेत मात्र, भाजपला पाठिंबा देत आहेत. यामुळे चिराग पासवान आणि भाजपमध्ये छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे.  

नवी दिल्ली : मुख्यमंत्री नितीशकुमार यांना तुरुंगात पाठवण्याची वल्गना लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी केली होती. यावर संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस  व बिहारचे मंत्री संजय कुमार झा यांनी चिराग यांनी मदाऱ्याच्या माकडाची उपमा दिली आहे. यामुळे मदारी कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे. झा हे नितीशकुमारांचे निकटवर्तीय मानले जातात. 

संजयकुमार झा म्हणाले की, मदाऱ्याचे माकड असते आणि त्याला नाचवत असतो मदारी. आता चिराग पासवान हे ते माकड बनले आहेत. त्यांनी कंगना राणावतसोबत अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. आता कंगना कुठे पोचली हे तुम्हीच पाहा. याचप्रमाणे सुशांतसिंह राजपूत याने कोणतीही पार्श्वभूमी नसताना बॉलीवू़डमध्ये स्वत:चा ठसा उमटवला. चिराग यांनी अभिनय केलेले चित्रपट मध्यंतरातून उठून जाण्यासारखे होते. आता निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर चिराग यांचीही अवस्था अशीच होईल. 

चिराग यांचा मदारी कोण असे विचारल्यावर झा म्हणाले की, ते सगळ्यांनाच माहीत आहे. बिहारमध्ये प्रथमच अशा प्रकारचे खालच्या पातळीवरील राजकारण होत आहे. नितीशकुमार यांची प्रतिमा स्वच्छ आहे. तुम्ही त्यांच्या कामाबद्दल जनतेसमोर प्रश्न विचारा. जनतेलाच यावर निर्णय घेऊ द्या. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये एकूण 243 विधानसभा मतदारसंघ आहेत. 

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. काँग्रेस बिहारमध्ये 70 जागा लढवत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी 28 ऑक्टोबरला बिहारमध्ये दोन सभा घेणार आहेत. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जेडीयूच्या विरोधात त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख