पित्याला मुखाग्नी दिला अन् चिराग पासवान खाली कोसळले... - chirag paswan fainted after performing last rites of his father ramvilas paswan | Politics Marathi News - Sarkarnama

पित्याला मुखाग्नी दिला अन् चिराग पासवान खाली कोसळले...

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020

लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांना आज हजारो कार्यकर्त्यांनी साश्रू नयनांनी निरोप दिला. या वेळी सर्वच राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. 

पाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) संस्थापक आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर आज सरकारी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. दिघा घाटावर गंगा किनारी पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी मुखाग्नी दिला. त्यावेळी शोकाकुल झालेले चिराग हे बेशुद्ध होऊन खाली कोसळले. अखेर नातेवाईकांनी चिराग यांना आधार देत उभे केले. 

पासवान यांची अंत्ययात्रा आज दुपारी निघाली तेव्हा मोठी गर्दी झाली होती. वडिलांच्या पार्थिवाशेजारी उभे असलेल्या चिराग पासवान यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. त्यांना सावरणे नातेवाईकांना कठीण जात होते. चिराग यांचे चुलत बंधू खासदार प्रिन्सराज त्यांना आधार देत होते. आपल्या प्रिय नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिक उभे होते. हजारो लोकांनी पासवान यांना साश्रू नयनांनी शेवटचा निरोप दिला. 

या वेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, गिरिराज सिंह, नित्यानंद राय, अश्विनी चौबे, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर दिघा घाटावर उपस्थित होते. 

पासवान यांच्या अंतिम यात्रेत आज कुटुंबातील सदस्यांसह त्यांच्या दोन्ही पत्नी सहभागी झाल्या होत्या. पहिली पत्नी राजकुमारी व दुसरी पत्नी रीना शर्मा या दोन वेगवेगळ्या वाहनांमध्ये होत्या. पाटण्यात पासवान यांच्या घरी त्यांचे पार्थिव पाहून राजकुमारी या बेशुद्ध पडल्या होत्या. 

रामविलास पासवान (वय 74) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावर फोर्टिस एस्कॉर्ट्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता. त्यांचे मूत्रपिंडही निकामी झाले होते. त्यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र चिराग हे चालवत आहेत. पासवान यांनी स्थापन केलेल्या लोक जनशक्ती पक्षाची धुराही चिराग हेच सांभाळत आहेत. 

पासवान यांना ऑगस्टमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आधीपासून हृदयविकाराचा त्रास होता. त्यांची 2017 मध्ये हृदय शस्त्रक्रिया झाली होती. लंडनमध्ये झालेल्या या शस्त्रक्रियेत त्यांच्या हृदयातील सदोष व्हॉल्व हा दुसरे उपकरण बसवून दुरुस्त करण्यात आला होता. त्याआधी त्यांची अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख