अनेक महिने गायब असलेले जॅक मा प्रकटले...पण एवढे दिवस होते कुठे? - chinese businessman jack ma emerges first time after government crackdown | Politics Marathi News - Sarkarnama

अनेक महिने गायब असलेले जॅक मा प्रकटले...पण एवढे दिवस होते कुठे?

वृत्तसंस्था
बुधवार, 20 जानेवारी 2021

चीन सरकारच्या धोरणांवर टीका केल्यानंतर उद्योगपती जॅक मा गायब झाले होते. अखेर मा प्रकटले आहेत.  

बीजिंग : चीनमधील ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी असणाऱ्या अलिबाबा उद्योग समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा हे मागील काही महिन्यांपासून गायब झाले होते. चीन सरकारच्या धोरणांवर टीका केल्यानंतर त्यांच्या कंपन्यांवर सरकारकडून कारवाई सुरू होती. तेव्हापासून बेपत्ता झालेले जॅक मा अखेर आज प्रकट झाले आहेत. मात्र, ते कुठे गायब झाले होते यासह अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.  

जॅक मा आज ऑनलाइन कार्यक्रमात प्रकट झाले. त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षकांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी समाजसेवेला अधिक प्राधान्य देणाचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. जॅक हे आता प्रकट झाले असले तरी ते एवढे दिवस का गायब होते आणि कुठे गायब होते हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. मा हे प्रकट झाल्यानंतर हाँगकाँगमध्ये अलिबाबा कंपनीच्या शेअरमध्ये 4 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. 

या ऑनलाइन कार्यक्रमात जॅक मा म्हणाले की, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी विचार तसेच, अभ्यास केला आहे. शिक्षण क्षेत्रात सामाजिक कार्य करण्यासाठी अधिक वेळ देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ग्रामीण भागातील पुनरुज्जीवन आणि सर्वांचीच समृद्धी ही आपल्या पिढीतील उद्योजकांची जबाबदारी आहे.  

चीन सरकारच्या धोरणांवर केलेल्या टिकेनंतर जॅक मा यांनी कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. त्यामुळे जगभरामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या. जॅक मा यांच्या अँट समूहासंर्भात ऑक्टोबर महिन्यापासून एक नवीन वाद सुरु झाला होता. जॅक मा यांनी 24 ऑक्टोबरला  शांघायमध्ये भाषण करताना देशात संशोधनाला वाव मिळत नाही, असे मत व्यक्त केले होते. आपण सध्याची आर्थिक व्यवस्था बदलण्याची आवश्यकता असल्याचे, सांगत त्यांनी चीन सरकारच्या धोरणावर टीका केली होती. त्यांनी शेवटचे टि्वट 10 ऑक्टोबर 2019 रोजी केले होते. 

या कार्यक्रमानंतर जॅक मा दिसलेच नव्हते. आश्चर्याची बाब म्हणजे अलिबाबा कंपनीचे संस्थापक असणाऱ्या जॅक मा यांचा फोटोही कंपनीच्या संकेतस्थळावरुन काढून टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. अलिबाबा कंपनीच्या 'आफ्रिकाज् बिझनेस हिरोज' या कार्यक्रमांसाठी ते प्रमुख मार्गदर्शक असतानाही उपस्थित नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या जागी अलिबाबा कंपनीच्या अन्य एका अधिकाऱ्याने उपस्थिती लावली होती. जॅक मा हे कार्यक्रमाला उपस्थित का राहू शकले नाही, या प्रश्नावर त्यांच्या प्रवक्त्यांनी सारवासारव केली होती.  
जॅक मा यांच्या या वक्तव्यानंतर अँटच्या आयपीओला चीन सरकारने यंत्रणांनी दिलेली परवानगी नाकारण्यात आली. या आयपीओचे मूल्य सुमारे 37 अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते. जगातील सर्वात मोठ्य रकमेचा हा आयपीओ होता. शांघाय स्टॉक एक्सचेंजने अँट समूहासंदर्भात काही तक्रारी समोर आल्याचे सांगत ऐनवेळी तो रद्द करण्यास भाग पाडले होते. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख