सावधान...लहान मुले ठरताहेत कोरोनाची वाहक..! - childrens pose greater risk of spreading covid 19 says icmr | Politics Marathi News - Sarkarnama

सावधान...लहान मुले ठरताहेत कोरोनाची वाहक..!

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आता लहान मुले कोरोनाची वाहक ठरू लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

मुंबई : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. अनेक देशांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा निर्बंध लादण्यात आले आहेत. यातच आता लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी ती कोरोनाचे वाहक ठरू शकतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर)ने याबाबत माहिती दिली आहे. आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव म्हणाले की, देशभरात कोरोना संसर्ग पसरला असला तरी लहान मुलांमध्ये कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण कमी आहे. याशिवाय मृत्युदरही अतिशय कमी आहे. पाच वर्षांखालील मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे; मात्र काही राज्यांमध्ये लहान मुलांमधील संसर्गाचा आकडा 350 च्या वर असून, तेथे हा संसर्ग वेगाने पसरत आहे.

लहान मुलांसह किशोरवयीन मुलांची काळजी घेण्याचा सावधगिरीचा इशाराही आयसीएमआरने दिला आहे. आयसीएमआरने म्हटले आहे की, देशात लहान मुलांमध्ये कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण कमी आहे. देशात 17 वयोगटातील किशोरवयीन मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण केवळ आठ टक्के असून, राज्यात हेच प्रमाण 6.78 इतके आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 17 लाख 929 किशोरवयीन मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे संसर्गाचे प्रमाण कमी दिसत असले तरी या मुलांपासून कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असून, ते अधिक संसर्ग पसरवू शकतात. 

कावासाकी आणि कोरोनाची लक्षणे सारखीच आहेत. कावासाकी आजार ही लहान मुलांसाठी जीवघेणा ठरू शकतो; मात्र आपल्याकडे अजून कोरोनाबाधितांमध्ये कावासाकी आजार असलेले आढळले नाही. कावासाकी आजार हा पाच वर्षांच्या आतील लहान मुलांना अधिकतर होतो. यामुळे ताप, रक्तातील रक्तबिंबिकेचे प्रमाण वाढणे तसेच हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या नष्ट होणे अशा प्रकारचा त्रास होतो. यातच कोरोनाची बाधा झाल्यास ते जीवघेणे ठरू शकते. 

याविषयी बोलताना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उतुरे म्हणाले की, लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे सहसा आढळत नाहीत. लहान मुलांची कोरोना चाचणी शक्‍यतो केली जात नाही. त्यामुळे ते सायलेंट स्प्रेंडर ठरू शकतात. अशा मुलांपासून इतर मुलांना तसेच त्यांच्या पालकांना बाधा होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे सध्या मुलांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मुलांना शाळेत पाठवणे, कोणत्याही शिकवणीला पाठवणे, मुलांना एकत्र खेळायला पाठवणे हे टाळावे. आपल्याकडे या आजाराचे प्रमाण कमी असले तरी यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होत असल्याने हृदयविकाराचा तीव्र झटका येण्याचा धोका अधिक आहे.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख