पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटरने घेतला बाळाचा जीव; डॉक्टरनेच दिली कबुली - Child died after ventilator in the PM Care Fund suddenly shut down | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटरने घेतला बाळाचा जीव; डॉक्टरनेच दिली कबुली

वृत्तसंस्था
रविवार, 18 जुलै 2021

महाराष्ट्रासह पंजाब व अन्य काही राज्यांमधून या व्हेंटिलेटरच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

नवी दिल्ली : कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक रुग्णालयांना पीएम केअर फंडातून व्हेंटिलेटर देण्यात आले. पण हे व्हेंटिलेटर सतत नादुरूस्त होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या. त्यावरून जोरदार राजकारणही झालं. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्हेंटिलेटर अचानक बंद पडल्याने एका बाळाला आपला जीव गमवावा लागला आहे. एका डॉक्टरांच्या पत्रातूनच ही बाबा उघडकीस आली आहे. (Child died after ventilator in the PM Care Fund suddenly shut down)

पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटरवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला जातो. महाराष्ट्रासह पंजाब व अन्य काही राज्यांमधून या व्हेंटिलेटरच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. व्हेंटिलेटर खराब असल्याने त्याचा वापरच केला जात नसल्याचे प्रकार काही ठिकाणी उघडकीस आले आहेत. आता कानपूरमधील एका रुग्णालयात याच व्हेंटिलेटरने एका बाळाचा जीव घेतला आहे.

हेही वाचा : काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग; प्रदेशाध्यक्षांनी तातडीने बोलावली आमदारांची बैठक

कानपूर मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. एका हिंदी वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. या रुग्णालयातील एका बालरोगतज्ज्ञाने लिहिलेल्या पत्रातून ही बाब समोर आली आहे. व्हेंटिलेटरबाबत त्यांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना यावर्षी दोनदा पत्र लिहिले आहे. पहिले पत्र त्यांनी 21 मे रोजी लिहिलं आहे. रुग्णालयात अति गंभीर स्वरूपाचे रुग्ण येतात. त्यांच्या फुफ्फुसांतील संसर्गाचे प्रमाण जास्त असते. हे व्हेंटिलेटर आवश्यक ऑक्सिजन पुरवठा करू शकत नाहीत. त्यामुळे हे व्हेंटिलेटर गंभीर रुग्ण नसलेल्या रुग्णालयांत पाठवावे, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. 

दुसरे पत्र 6 जुलै रोजीचे असून त्यात AgVa व्हेंटिलेटर अचानक बंद पडल्याने एका बाळाचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तसेच लहान मुलांसाठी हे व्हेंटिलेटर वापरणे योग्य नाही. हे व्हेंटिलेटर मधेच बंद पडतात, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र, या बाळाचा मृत्यू नेमका कधी झाला याचा उल्लेख पत्रात करण्यात आलेला नाही. हे पत्र समोर आल्याने आता पुन्हा एका पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटरवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या टीकेनंतर एग्वा व्हेंटिलेटर कंपनीचे सह संस्थापक डॉ. दिवाकर वैश यांनी खुलासा केला होता. इतर व्हेंटिलेटर 10 ते 15 लाख रुपयांचे असतात. आमच्या कंपनीचे व्हेंटिलेटर एक ते दील लाख रुपयांचे आहेत. या व्हेंटिलेटरचे मेकॅनिझम समजून घ्यायला हवे, असे त्यांनी सांगितले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख