सरपंचाचा मुलगा होणार पहिला दलित मुख्यमंत्री!

अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळातील सहकार मंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांच्या नावाची सुरूवातीला शिफारस करण्यात आली होती.
Charanjit Singh Channi will be the first Dalit CM of Punjab
Charanjit Singh Channi will be the first Dalit CM of Punjab

नवी दिल्ली : कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याच मंत्रिमंडळातील तंत्र शिक्षणमंत्री चरणजीतसिंग चन्नी नवे मुख्यमंत्री असतील. काँग्रेसचे नेते व पंजाब प्रभारी हरीश रावत यांनी चन्नी यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळं चन्नी यांच्या रुपानं पंजाबला पहिला दलित शीख मुख्यमंत्री मिळणार आहे. पुढील काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतील जातीय समीकरणं डोळ्यासमोर ठेवून चन्नी यांच्या नावाला पसंती दिल्याची चर्चा आहे. (Charanjit Singh Channi will be the first Dalit CM of Punjab)

अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळातील सहकार मंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांच्या नावाची सुरूवातीला शिफारस करण्यात आली होती. त्यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात होते. त्यामुळं त्यांच्या घराबाहेर कार्यकर्ते नेतेही जमा होण्यास सुरूवात झाली होती. पण दिवसभराच्या घडामोडींनंतर रंधावा यांचं नाव मागे पडलं अन् चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. रंधावा यांच्याप्रमाणेच चन्नी हेही अमरिंदरसिंग यांच्या विरोधी गटातील मानले जातात. 

कोण आहेत चरणजीतसिंग चन्नी?

चरणजीतसिंग चन्नी हे अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळात तंत्र शिक्षण मंत्री होते. चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून ते 2007 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2012 आणि 2017 मध्येही ते निवडूण आले. 2015 ते 2016 या कालावधीत ते विरोधी पक्षनेते होते. तर अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडं तंत्र शिक्षण, पर्यटन व सांस्कृतिक हे विभाग होते. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री ठरतील. 

चन्नी यांचे वडिल एस. हरसा सिंग यांच्यापासून चन्नी यांना राजकारणाचे धडे मिळाले. ते खरार या गावाचे सरपंच होते. त्यानंतर ब्लॉक कमिटीचे अध्यक्षही झाले. याच काळात शालेय शिक्षण घेणारे चरणजीत सिंग यांचा राजकारणातील रस वाढू लागला. शालेय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली. चन्नी हे तीन टर्म नगरसेवक होते. तसेच खरार नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. 2007 मध्ये पहिल्यांदा त्यांना काँग्रेसकडून विधानसभेचे तिकीट मिळाले. 

सोमवारी होणार शपथविधी

मुख्यमंत्रीपदासाठी नाव घोषित झाल्यानंतर काही वेळातच चन्नी यांनी राजभवनमध्ये जात राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर सोमवारी सकाळी 11 वाजता त्यांचा शपथविधी निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळं सोमवारी पंजाबला चन्नी यांच्या रुपानं नवे मुख्यमंत्री मिळतील. मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांबाबत अद्याप अस्पष्टता आहे. पण चन्नी यांच्या जोडीला दोन उपमुख्यमंत्री देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं समजतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com