'एक व्यक्ती एक पद' सुत्रानुसार काँग्रेसमध्ये होणार फेरबदल; लोकसभेतील पक्षनेताही बदलणार    - Change of leadership in Lok Sabha after Congress Parliament strategy group meet | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

'एक व्यक्ती एक पद' सुत्रानुसार काँग्रेसमध्ये होणार फेरबदल; लोकसभेतील पक्षनेताही बदलणार   

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जुलै 2021

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येत्या 14 जुलै रोजी संसदीय स्ट्रॅटेजी ग्रुपची बैठक बोलावली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षामध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. 'एक व्यक्ती एक पद' या सुत्रानुसार हे बदल संभवतात. काँग्रेसकडून लोकसभेतील पक्षनेताही बदलण्याची चर्चा असून त्यांच्याजागी शशी थरूर (Shashi Tharoor), मनिष तिवारी यांच्यासह अन्य काही नेत्यांची नावे चर्चेत आहेत. (Change of leadership in Lok Sabha after Congress Parliament strategy group meet)

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी येत्या 14 जुलै रोजी संसदीय स्ट्रॅटेजी ग्रुपची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर लोकसभेतील पक्षनेता बदलण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच याच बैठकीत 'एक व्यक्ती एक पद' या सुत्रावर चर्चा केली जाणार आहे. त्यानुसार पक्षाच्या लोकसभेतील नेत्यांकडे असलेल्या जबाबदाऱ्याही बदलल्या जाऊ शकतात, असे समजते. 

हेही वाचा : काँग्रेसला लवकरच मोठा धक्का; शत्रुघ्न सिन्हा पक्षाला ठोकणार रामराम

लोकसभेतील पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांना बदलण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. सोनिया गांधी यांना पक्षातील धोरणांबाबत अत्यंत कठोर शब्दांत पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये समावेश असलेले काही नेते या पदासाठी इच्छूक असल्याचे सुत्रांनी सांगितले. अधीर रंजन हे पश्चिम बंगालमधील खासदार आहेत. तसेच ते बंगाल काँग्रेसचे अध्यक्षही आहेत. बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला एकही जागा मिळाली नाही. पक्षावर पहिल्यांदाच ही नामुष्की ओढावली असल्याने पक्षनेतृत्व त्यांच्यावर नाराज असल्याचे समजते. 

येत्या 19 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यामुळं अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच नवीन पक्षनेत्याची घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांचे नाव पक्षनेता म्हणून पुढे नसल्याचे सुत्रांनी सांगितले. शशी शरूर, मनीष तिवारी, गौरव गोगोई यांसह अन्य काही नेत्यांच्या नावावर विचार केला जाऊ शकतो. 

दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. राहूल गांधी यांनी अध्यक्ष पद स्वीकारण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. काही नेत्यांनी त्यांनी मन वळवण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच ठेवला आहे. पण ते अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नाहीत. यावरून काँग्रेसमधीलच काही बड्या नेत्यांनी पक्षाच्या धोरणांवरच उघडपणे टीका केली आहे. त्यामध्ये आनंद शर्मा, कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, राज बब्बर यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख