पूनावालांच्या प्रयत्नांना यश; 'सिरम'ला 3 हजार तर भारत बायोटेकला दीड हजार कोटींची निधी

सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला असला तरी देशात लशीचा तुटवडा जाणवत आहे.
central government will give credit of serum institute and bharat biotech
central government will give credit of serum institute and bharat biotech

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर पोचली आहे. यामुळे सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला असला तरी लशीचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर लशीचे उत्पादन वाढवण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली होती. अखेर सरकारने सिरमला 3 हजार कोटी आणि भारत बायोटेकला दीड हजार कोटी रुपयांचा कर्जाऊ निधी दिला आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. यातील कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सरकारने वाढवून 6 ते 8 आठवडे केले आहे. याआधी या दोन्ही लशींसाठी दोन डोसमधील अंतर 4 आठवडे होते. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

देशात लशीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आम्हाला लस उत्पादन वाढवण्यासाठी 3 हजार कोटी रुपये द्या, अशी मागणी अदर पूनावालांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यांनी म्हटले होते की, आम्हाला 3 हजार कोटींचा निधी मिळाल्यास लशीचे उत्पादन तीन महिन्यांत वाढू शकेल. याबाबत आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने निर्णय न घेतल्यास आम्ही बँकांकडे कर्जासाठी जाऊ. 

आता केंद्र सरकारने पूनावालांची मागणी मान्य केली आहे. देशातील लस उत्पादनाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने सिरमला 3 हजार कोटी रुपये आणि भारत बायोटेकला 1 हजार 500 कोटी रुपयांचा कर्जाऊ निधी दिला आहे. याबद्दलच्या प्रस्तावाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज तत्वत: मंजुरी दिली. आता संबंधित मंत्रालयाच्या माध्यमातून दोन्ही कंपन्यांकडे हा निधी पोचणार आहे. लवकरात लवकर हा निधी कंपन्यांना पोचेल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.  

अदर पूनावाला यांनी नुकतेच म्हटले होते की, सिरमकडून सवलतीच्या दरात केंद्र सरकारला कोरोना लस दिली जात आहे. यामुळे आम्हाला लशीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी 3 हजार कोटी रुपयांची गरज आहे. जूनपर्यंत उत्पादन वाढवायचे झाल्यास एवढा मोठा निधी लागेल. आम्ही केंद्र सरकारला 150 ते 160 रुपयांना लस देत आहोत. या लशीची सर्वसाधारण किंमत 20 डॉलर (सुमारे 1 हजार 500 रुपये) आहे. केंद्र सरकारने विनंती केल्यामुळे आम्ही सवलतीच्या दरात लस देत आहोत. यामुळे आम्हाला फारसा नफा होत नाही. याचा परिणाम लशीचे उत्पादन वाढवण्यावर होत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com