आठ महिन्यांनंतरही मृत्यूचं गूढ उलगडेना...पण सरकार देणार सुशांतच्या चाहत्यांना मोठं गिफ्ट! - central government will announce award in the name of sushant singh rajput | Politics Marathi News - Sarkarnama

आठ महिन्यांनंतरही मृत्यूचं गूढ उलगडेना...पण सरकार देणार सुशांतच्या चाहत्यांना मोठं गिफ्ट!

वृत्तसंस्था
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचे गूढ आठ महिने उलटल्यानंतरही उलगडले नाही. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अद्याप तपासाची प्रगती जाहीर केलेली नाही. सुमारे आठ महिन्यांनतरही सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.  सीबीआयने या तपासाबद्दल मौन धारण केल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. असे असले तरी केंद्र सरकारने सुशांतचा मरणोत्तर मोठा गौरव करण्याची तयारी केली आहे. याद्वारे सुशांतच्या चाहत्यांना सरकार मोठे गिफ्ट देणार आहे. 

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतचा मरणोत्तर गौरव करण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. सुशांतच्या नावाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्याची योजना आहे. याबाबतचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. परंतु, काही विलंब लागला तरी यावर शिक्कामोर्तब होईल. सुशांतच्या चाहत्यांना विशेष गिफ्ट देण्याचा सरकारचा विचार आहे. 

याआधी सुशांतची बहीण श्वेतासिंह किर्तीने त्याच्या नावाने शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. सुशांतच्या 35 जन्मदिवसाचे औचित्य साधत तिने यूसी बर्कलेतील भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती जाहीर केली होती. आता सरकारी पातळीवर सुशांतचा मरणोत्तर गौरव करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

सुशांत हा 14 जूनला मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणी सुरूवातीला मुंबई पोलीस तपास करीत होते. मुंबई पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अभिनेत्री कंगना राणावत, भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी आणि राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता. 

या प्रकरणात नंतर बिहार सरकारनेही उडी घेतली होती. बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन तेथील पोलीस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता. 

सीबीआयने दोन वेळा सुशांतच्या मृत्यूच्या वेळचा घटनाक्रम त्याच्या फ्लॅटमध्ये तयार करुन पुन्हा तपासला होता. त्यानंतर सीबीआयच्या पथकासमवेत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन न्यायवैद्यक तज्ञांनी मुंबईतील सुशांतच्या घराची तपासणी केली होती. या  पथकाने सुशांतचा फ्लॅट आणि इमारतीच्या छताची काही काळ तपासणी केली होती. या पथकाने सुशांतच्या मृत्यूची वेळ शवविच्छेदन अहवालात नसल्याबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते. 

सीबीआयकडे 'एम्स'च्या पथकाने अहवाल सादर केला होता. मुंबई पोलिसांनी दिलेला सुशांतचा शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासणी करुन 'एम्स'च्या पथकाने हा अहवाल तयार केला होता. सीबीआयने या अहवालाचा अभ्यास केला आहे. या प्रकरणातील इतर पुराव्यांच्या आधारे सीबीआय अंतिम निष्कर्षापर्यंत पोचणार आहे. 'एम्स'च्या अहवालात सुशांतवर विषप्रयोग झाला नसल्याची बाबही नमूद करण्यात आली होती. यामुळे सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे, अशी चर्चा सुरू होती. 

मात्र, सीबीआयने या प्रकरणी खुलासा करीत तपास सुरू असल्याचे म्हटले होते. सीबीआयने म्हटले होते की, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. सर्व पैलू काळजीपूर्वक तपासून पाहण्याचे काम सुरू आहे. सीबीआयने याबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख