भारतीयांचा योग्य मान ठेवा; केंद्र सरकारने व्हॉट्सअॅप ला सुनावले

व्हॉट्सअॅपचे मुख्य कायर्कारी विल कॅथकार्ट यांना पत्र लिहून त्यात वापरकर्त्यांच्या माहितीच्या सुरक्षितेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
The central government told WhatsApp that Respect Indians properly
The central government told WhatsApp that Respect Indians properly

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपने आणलेल्या नवीन गोपनीयता धोरणावर देशभरातून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर आता केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे धोरण मागे घेण्याची सुचना व्हॉट्सअॅपला केली आहे. व्हॉट्सअॅपचे मुख्य कायर्कारी विल कॅथकार्ट यांना पत्र लिहून त्यात वापरकर्त्यांच्या माहितीच्या सुरक्षितेबाबत प्रश्न करत कंपनीकडून भारतीयांचा योग्य मान ठेवावा, असे सुनावण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅपचा देशभरात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण काही दिवसांपुर्वी व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांच्या माहितीच्या गोपनियतेच्या धोरणात बदल केल्याची चर्चा आहे. विरोधानंतर तीन महिन्यांसाठी त्याची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आधीच्या तुलनेत वापरकर्त्याची अधिक माहिती फेसबुक, इन्स्टाग्रामला शेअर केली जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

हे धोरण मान्य नसल्यास व्हॉट्सअॅपचा वापर थांबवावा लागणार असल्याचे संकेतही कंपनीने दिले होते. या धोरणावरून देशभरातील वापरकर्ते तसेच विविध संघटनांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तसेच वापरकर्त्यांच्या माहितीच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

काही संघटनांनी केंद्र सरकारकडेही यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअॅपच्या सीईओंना पत्र लिहून वापरकर्त्यांच्या माहितीचा गैरवापर होण्याची भिती व्यक्त केली. तसेच यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 2017 मधील एका प्रकरणातील गोपनियतेच्या नियमांची आठवण करून दिली आहे.

भारतीय संसदेमध्ये पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिलावर चर्चा सुरू असताना व्हॉट्सअॅपने हे धोरण का आणले? हे बिल संयुक्त संसदीय समितीच्या विचाराधीन आहे. या बिलामध्ये कंपनी ज्या कारणासाठी वापरकर्त्याची माहिती घेणार आहे, त्याचसाठी माहिती वापर व्हावा, याची तरतुद आहे. तसेच त्यासाठी वापरकर्त्याची संमतीही आवश्यक आहे.

हे बिल मंजुर झाल्यानंतर व्हॉट्सअॅपला वापरकर्त्यांची माहिती अन्य कंपन्यांना देता येणार नाही. युरोप व भारतामध्ये गोपनियतेसंदर्भात वेगळी धोरणे आहेत. भारतात व्हॉट्सअॅपचे वापरकर्ते सर्वाधिक आहेत. असे असूनही त्यांच्यासोबत भेदभाव केला जात आहे, अशी नाराजीही पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

भारतीय नागरिकांना त्यांच्या हिताचे संरक्षण करण्याचा अधिकार असून त्याच्याशी तडजोड केली जाणार नाही, असेही सरकारने व्हॉट्सअॅपला सुनावले आहे. वापरकर्त्यांच्या माहितीची सुरक्षितता व नवीन धोरणासंदर्भात 14 प्रश्नांवर खुलासा मागविण्यात आला आहे. 

दरम्यान, नवीन धोरणाला विरोध झाल्यानंतर व्हॉट्सअॅपने माघार घेत काही दिवसांसाठी वापरकर्त्यांना दिलासा दिला आहे. दि. 8 फेब्रुवारी रोजी कोणतेही व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद होणार नाही. नवीन धोरणासंदर्भात निर्माण झालेले गैरसमज दूर केले जात आहेत. तुमच्या गोपनियतेला कोणताही धोका नसून ते पुणर्पणे सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपने दिले आहे.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com