खूषखबर : कोरोना लशीची किंमत झाली कमी; जाणून घ्या किती रुपयांत मिळणार लस

कोरोना लसीकरण देशभरात सुरू असताना सरकारने जनतेला दिलासा दिला आहे. सरकारने कोरोना लशीची किंमत केली आहे.
central government reduces price of covid19 vaccine for second phase
central government reduces price of covid19 vaccine for second phase

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात येत आहे. सरकारी रुग्णालयात कोरोनाची लस मोफत तर खासगी रुग्णालयात तिच्यासाठी अडीचशे रुपये आकारण्यात येत आहेत. आता केंद्र सरकारने लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा करुन ही किंमत आणखी कमी केली आहे. 

केंद्रीय आरोग्य सचिव राजीव भूषण यांना याबाबत घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोरोना लशीचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांशी आम्ही चर्चा केली आहे. त्यांनी लशीची किंमत आणखी कमी करण्यास होकार दिला आहे. याआधी लशीची किंमत करांसह 210 रुपये होती. आता ती 200 रुपयांच्या आत मिळेल. याचबरोबर देशात कुठेही कोरोना लशीचा तुटवडा नाही.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, कोव्हिशिल्डची उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दहा कोटी डोस 150 रुपये अधिक जीएसटी या किमतीने देण्यास संमती दर्शविली आहे. याआधी खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लशीच्या एका डोससाठी 250 रुपये आकारले जात होते. आता किंमत कमी झाल्याने 200 रुपये आकारले जातील.  

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत आहेत.

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com