सँडलवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री रागिनी द्विवेदीला अटक

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासात बॉलीवूडमधील ड्रग्जच्या वापराचा मुद्दा समोर आला आहे. याचवेळी आता सँडलवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ccb interrogates kannada actress ragini dwivedis residence in bengaluru
ccb interrogates kannada actress ragini dwivedis residence in bengaluru

बंगळूर : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) तपास सुरू आहे. या प्रकरणी बॉलीवूडमधील ड्रग्जच्या वापराचा मुद्दा समोर आला आहे. काही अभिनेते ड्रग्ज घेतल्याशिवाय अभिनयच करु शकत नाहीत, असा आरोप होत आहे. आता सँडलवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीच्या घरावर आज केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) छापे घालून तिला अटक केली आहे. 

सीसीबीने आज सकाळी 6 वाजता अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिच्या घरावर छापा घातला. सीसीबीने रागिनीला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. मात्र, तिने वकिलांनी पाठवून मुदतवाढ मागितली होती. मात्र, पोलिसांनी तिला आजच हजर होण्यास सांगितल्याने ती अखेर हजर झाली. तिची चौकशी करण्यात येत आहे. तिच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून, यात अनेक बड्या नावांचा समावेश आहे. चौकशीनंतर तिला अटक करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कन्नड चित्रपटसृष्टी म्हणजेच सँडलवूडमध्ये ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या तीन जणांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास करण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणी निर्माता व पत्रकार इंद्रजित लंकेश याची चौकशी करण्यात आली आहे. त्याने चौकशीत सँडलवूडमधील किमान 15 जणांची नावे उघड केली होती. यात रागिनी हिचे नाव असल्याने ती तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. आता तपास यंत्रणांनी सँडलवूडमधील ड्रग्ज कनेक्शनच्या मुळाशी जाण्याचा चंग बांधला आहे. 

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुरू केला आहे. सुशांतही ड्रग्ज घेत होता, असा आरोप त्याची माजी मॅनेजर श्रुती मोदी हिच्या वकिलांनी केला होता. यामुळे आता ड्रग्जचा अँगलही समोर आला आहे. यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईत काही जणांना अटक केली आहे. त्यांचे बॉलीवूडशी असलेले ड्रग कनेक्शन तपासण्यात येत आहे. 

सुशांत प्रकरणात सुमोर आलेल्या चॅटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे बॉलीवूडमधील ड्रग्जचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा याच्या ओळखीचा ड्रग डिलर बसित परिहार यालाही अटक करण्यात आली आहे. याचबरोबर आज मिरांडा आणि रियाचा भाऊ शौविक यांना आज ताब्यात घेण्यात आल्याचेही समजते. 

बॉलीवूडच्या ड्रग कनेक्शनवर कंगना राणावतने ट्विटरवर भूमिका मांडली होती. तिने म्हटले होते की, रणवीरसिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशिक यांनी ड्रग टेस्टसाठी त्यांचे रक्ताचा नमुना द्यावा, अशी विनंती मी करते. हे सर्वजण ड्रग अॅडिक्ट असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्याविषयी पसरत असलेल्या या अफवा त्यांनीच खोडून काढाव्यात. त्यांनी ड्रग अॅडिक्ट नसल्याचे सिद्ध केल्यास ते कोट्यवधी तरुणांना प्रेरित करतील. 

कंगनाने या ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालयालाही टॅग केले होते. याआधी कंगनाने बॉलीवूडमध्ये एनसीबीने प्रवेश केल्यास अनेक मोठे स्टार गजाआड जातील, असा दावा केला होता. एनसीबीला यासाठी मदत करण्याची तयारी आहे मात्र, केंद्र सरकारने मला संरक्षण द्यावे, अशी मागणी तिने केली होती. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com