सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम...सीबीआय तपास अद्याप संपलाच नाही!

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरून अद्याप गदारोळ सुरू आहे. 'एम्स'च्या अहवालात सुशांतने आत्महत्या केली असल्याचे म्हटले आहे मात्र, सीबीआयने तपास सुरूच असल्याचे म्हटले आहे.
CBI investigation related to the death of Sushant Singh Rajput is still continuing
CBI investigation related to the death of Sushant Singh Rajput is still continuing

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अद्याप तपास सुरूच असल्याचे आज जाहीर केले. सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे, अशी चर्चा सुरू झाली होती. 'एम्स'च्या अहवालाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आल्याचीही चर्चा सुरू होती. आता सीबीआयने केलेल्या खुलाशामुळे या प्रकरणातील गूढ कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने दोन वेळा सुशांतच्या मृत्यूच्या वेळचा घटनाक्रम त्याच्या फ्लॅटमध्ये तयार करुन पुन्हा तपासला होता. त्यानंतर सीबीआयच्या पथकासमवेत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन न्यायवैद्यक तज्ञांनी मुंबईतील सुशांतच्या घराची तपासणी केली होती. या  पथकाने सुशांतचा फ्लॅट आणि इमारतीच्या छताची काही काळ तपासणी केली होती. या पथकाने सुशांतच्या मृत्यूची वेळ शवविच्छेदन अहवालात नसल्याबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते. 

सीबीआयकडे 'एम्स'च्या पथकाने अहवाल सादर केला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेला सुशांतचा शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासणी करुन 'एम्स'च्या पथकाने हा अहवाल तयार केला आहे. सीबीआयने या अहवालाचा अभ्यास केला. या प्रकरणातील इतर पुराव्यांच्या आधारे सीबीआय अंतिम निष्कर्षापर्यंत पोचली आहे. 'एम्स'च्या अहवालात सुशांतवर विषप्रयोग झाला नसल्याची बाबही नमूद करण्यात आली आहे. यामुळे सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे, अशी चर्चा सुरू होती. 

आज सीबीआयने या प्रकरणी खुलासा केला आहे. सीबीआयने म्हटले आहे की, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. सर्व पैलू काळजीपूर्वक तपासून पाहण्याचे काम सुरू आहे. सीबीआयने याबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. 

'एम्स'च्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले  होते की, सुशांतच्या शरीरावर गळफासाव्यतिरिक्त कोणतीही इतर जखम नव्हती. याचबरोबर त्याचा कोणाशी संघर्ष अथवा झटापट झाल्याच्याही शरीरावर कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. त्याच्या कपड्यांवरही अशा प्रकारच्या खुणा सापडलेल्या नाहीत. 

सुशांत हा 14 जूनला मृतावस्थेत आढळला होता आणि साडेतीन महिन्यांनंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम होते. या प्रकरणी सुरूवातीला मुंबई पोलीस तपास करीत होते. मुंबई पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अभिनेत्री कंगना राणावत, भाजपचे खासदार सुब्रह्मण्याम स्वामी आणि राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता. यात नंतर बिहार सरकारनेही उडी घेतली होती. बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन तेथील पोलीस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com