बाबरीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात...

बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी न्यायालयाने लालकृष्ण अडवानींसह 32 जणांची सीबीआय न्यायालयाने मुक्तता केली आहे. या निकालावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत.
cbi court babri verdict runs counter to the supreme court judgment says randeep surjewala
cbi court babri verdict runs counter to the supreme court judgment says randeep surjewala

नवी दिल्ली : बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्यासह 32 जणांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या निकालाचे स्वागत केले आहे. याचवेळी या निकालाबद्दल काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जाणारा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. 

अयोध्येत 6 डिसेंबर 1992 रोजी लाखो कारसेवकांच्या उपस्थित बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्यावेळी देशात काँग्रेसचे सरकार होते आणि पी. व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान होते. अयोध्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी निकाल दिला होता. त्यानंतर राम मंदिर भूमिपूजनचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता. वास्तविक राम मंदिराबाबत निकाल लागल्याने आजचा निकालही अपेक्षित होता, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयासमोर  351 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदपत्रे पुरावा म्हणून सादर केली होती. न्यायालयात 48 जणांविरोधात आरोप निश्‍चित करण्यात आले. मात्र, त्यापैकी 16 जणांचा खटला सुरु असताना मृत्यू झाला आहे. सोळाव्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी चिथावणी दिली, असा आरोप सीबीआयने ठेवला होता. 

अडवानी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव आज गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली होती. उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली असून, कल्याणसिंह सध्या प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल आहेत. आज एकूण 16 आरोपी न्यायालयात  हजर होते. यामध्ये साध्वी ऋतंभरा, चंपत राय, विनय कटियार, ब्रिजमोहन शरणसिंह आणि इतर काही जणांचा समावेश होता.  

या विषयी बोलताना काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, बाबरी प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा सीबीआय न्यायालयाचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने आधी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात जाणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने बाबरी मशीद पाडणे बेकायदा असल्याचे म्हटले होते. याचबरोबर घटनात्मक तत्वांच्या विरोधात जाणारा हा निर्णय आहे.  या निकालाच्या विरोधात आव्हान देण्याची मागणी घटनेवर विश्वास असलेल्या प्रत्येक भारतीयाने आता केंद्र व राज्य सरकारकडे करावी. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com