IAS अधिकाऱ्याचं वादग्रस्त वक्तव्य अन् भाजप-काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांमध्येच जुंपली

शनिवारी शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला आहे. यामध्ये काही शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत.
BJP Congress
BJP Congress

चंदीगड : शेतकऱ्यांची डोकी काठीने फोडा, असा आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिला होता. त्यावरून आता भाजप अन् काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांमध्येच जुंपली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी एकमेकांवर टीका केली आहे. आंदोलन करणारे शेतकरी नेमके कोणत्या राज्यातील यावरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. (Capt Amarinder Singh and Manohar Lal Khattar blames each other)

हरयाणा राज्यातील करनाल जिल्ह्यात शनिवारी शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला आहे. यामध्ये काही शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. या लाठीहल्ल्यानंतर एका शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा दावाही शेतकरी संघटनांनी केला आहे. उपजिल्हाधिकारी आयुष्य सिन्हा यांनीच शेतकऱ्यांची डोकी फोडा असा आदेश दिल्याचा दावाही संघटनांनी केला आहे. तसेच या आदेशाबाबतचा व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. 

या लाठीहल्ल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी हरयाणा सरकारवर टीका करत खट्टर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर खट्टर यांनी माझा राजीनामा मागणारे ते कोण आहेत, या प्रश्न उपस्थित केला. शेतकरी आंदोलनामागे तेच असल्यानं त्यांनीच राजीनामा द्यावा. दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणारे शेतकरी पंजाबमधील आहेत. हरयाणातील शेतकरी सिंघू किंवा टिकरी सीमेवर आंदोलन करत नाहीत. पंजाबमध्ये अमरिंदर सिंग तर हरयाणात भूपिंदर हूडा शेतकऱ्यांना भडकवत असल्याचा आरोपही खट्टर यांनी केला. 

अधिकाऱ्याने शेतकऱ्यांविषयी वापरलेले शब्द अयोग्य होते. पण कायदा-सुव्यवस्थेसाठी थोडं कठोरही होणंही गरजेचं आहे, असंही खट्टर यांनी स्पष्ट केलं. त्याला प्रत्युत्तर देताना अमरिंदर सिंग यांनी खट्टर यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले, खट्टर यांचं सरकार शेतकरी विरोधी असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं आहे. शेतकरी भाजपच्या बैठकीविरोधात आंदोलन करत होते. तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला. ते पंजाबमधील नव्हते तर हरयाणातील होते, असं सिंग यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

काय म्हणाले होते आयुष सिन्हा?

आयुष सिन्हा पोलिसांना आदेश देताना त्यांच्या मागून हा व्हिडीओ घेण्यात आला आहे. ते म्हणतात, कोणीही शेतकरी बॅरिकेड पार करता कामा नये. सगळं स्पष्ट आहे. कुणी कुठूनही असो, त्याच्यापुढे जाऊ देऊ नका. जर कुणी जात असेल तर काठीने डोकं फोडा. कोणत्याही आदेशाची गरज नाही. पकडून-पकडून मारा. कोणत्याही परिस्थितीत सुरक्षा टिकली पाहिजे. आपल्याकडे अतिरिक्त फोर्स आहे. तुम्ही हेल्मेट घाला. आम्ही पूर्ण रात्र झोपलो नाही. दोन दिवसांपासून ड्यूटी करतोय. सर्व काही स्पष्ट काही ना? इथून पुढे कुणी गेलं तर त्याचं डोकं फुटलेलं दिसायला हवं, असं सिन्हा म्हणत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com