मोबाईलवर बिझी नर्सने एकाच महिलेला दिली दोन वेळा कोरोना लस!

देशात 1 एप्रिलपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झाला असून, यात 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास येत आहे.
busy on mobile nurse gives woman two covid vaccines shots
busy on mobile nurse gives woman two covid vaccines shots

नवी दिल्ली : देशात 1 एप्रिलपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झाला असून, यात 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास येत आहे. दरम्यान, मोबाईलवर बोलण्यात गुंतलेल्या एका नर्सने एकाच महिलेला कोरोनाची लस दोन वेळा दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित महिलेच्या नातेवाईकांना तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात आज घडली. अकबरपूर भागातील एक महिला प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोमा लस घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी तेथील नर्सने मोबाईलवर बोलण्याच्या नादात संबंधित महिलेला कोरोनाचा डोस दोन वेळा दिला. या महिलेने याची माहिती नातेवाईकांना दिली. नातेवाईकांना रुग्णालयात येऊन गोंधळ घातल्यानंतर जिल्हाधिकारी आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, दोन वेळा लस देणाऱ्या नर्सने संबंधित महिलेला धमकावल्याचा आरोपही तिच्या नातेवाईकांनी केला आहे. 

दोन वेळा लस देण्यात आलेल्या महिलेच्या हाताला सूज आली आहे. इतर कोणताही त्रास अजून तरी झालेला दिसत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना या प्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

१ एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जात आहे. यासाठी सरकारने नोंदणीचे दोन पर्याय ठेवले आहेत. यासाठी सरकारी को-विन अॅपवर ऑनलाइन नोंदणी करण्याचा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय हा प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याचा असेल. मात्र, प्रत्यक्ष नोंदणीसाठी नागरिकांना दुपारी 3 वाजल्यानंतर लसीकरण केंद्रावर जावे लागेल.

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. १ एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. यातील कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सरकारने वाढवून 6 ते 8 आठवडे केले आहे. याआधी या दोन्ही लशींसाठी दोन डोसमधील अंतर 4 आठवडे होते. त्यामुळे आधी पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी नोंदणी आपोआप होत होती. आता दोन्ही लशींच्या दोन डोसमधील अंतर वेगवेगळे असल्याने आपोआप नोंदणी बंद करण्यात आली आहे. नागरिकांना पहिला डोस घेतल्यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्या डोससाठी नोंदणी करावी लागेल. 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com