तब्बल ९ लाख कोरोना लशीचे डोस घेऊन जात असलेली बस बंद पडते तेव्हा...

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, कोरोना लशीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
bus carrying covid vaccines breaks down at patna airport
bus carrying covid vaccines breaks down at patna airport

पाटणा : देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, कोरोना लशीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. यावरुन केंद्र सरकार विरुद्ध राज्ये असा संघर्ष सुरू झाला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. असे असताना कोरोना लशीचे तब्बल नऊ लाख डोस घेऊन जाणारी विशेष बस अचानक बंद पडल्याने एक वेगळेच नाट्य रंगले. 

बिहारमधीव पाटणा विमानतळावरुन कोरोना लशीचे डोस घेऊन जाण्यासाठी विशेष बस आणण्यात आली होती. लशीची वाहतूक करण्यासाठी या बसचा वापर केला जात आहे. विमानतळावर या बसमध्ये लशीचे डोस ठेवण्यात आले. हे डोस नालंदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील साठवणूक केंद्रात पोचवले जाणार होते. परंतु, विमानतळातून बाहेर पडत असतानाच बस अचानक बंद पडली. 

बसची बॅटरी उतरल्याने ती बंद पडली. त्यामुळे ती सुरूही होईना. तिथे असलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकारी -कर्मचाऱ्यांची चिंता यामुळे वाढली. अखेर त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आजूबाजूला असलेल्या नागरिकांना बसला धक्का मारण्याची विनंती केली. बसला धक्का मारल्यानंतर ती अखेर सुरू झाली आणि लशीचे डोस योग्य स्थळी मार्गस्थ झाले. याचबरोबर आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com