...तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मायावतींचा निर्धार - bsp supremo mayawati says she will never form alliance with bjp | Politics Marathi News - Sarkarnama

...तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मायावतींचा निर्धार

वृत्तसंस्था
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

बिहार विधानसभा निवडणुकीसह मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. दोन्ही राज्यात मायावती यांचा बहुजन समाज पक्ष मैदानात उतरला आहे. 

लखनौ : लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीसाठी कधीही भाजपसोबत आघाडी करणार नाही, असा निर्धार बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी आज व्यक्त केला. भाजपसारख्या पक्षांसोबत आघाडी करण्याऐवजी मी राजकारणातून संन्यास घेईन, अशी जाहीर भूमिका त्यांनी घेतली आहे. 

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाने बसपचे काही आमदार फोडल्याने मायावती भडकल्या होत्या. यावरून त्यांनी थेट भाजपशी आघाडी करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावत आहेत, ‘बसप’पासून मुस्लिम समाज दूर जावा म्हणून अशाप्रकारची वक्तव्ये केली जात असल्याचे मायावतींनी म्हटले आहे. 

आमच्या पक्षाची विचारधारा ही ‘सर्वजन सर्व धर्म हिताय’ अशी आहे आणि ती भाजपच्या विचारधारेच्या पूर्णपणे विरोधात आहे. जातीयवादी, धार्मिक आणि भांडवलशाही विचारधारा असणाऱ्या लोकांशी आम्ही कधीच आघाडी करणार नाही. भाजपसारख्या पक्षांसोबत आघाडी करण्याऐवजी मी राजकारणातून संन्यास घेईन, आम्ही सर्वच आघाड्यांवर भाजपसारख्या पक्षांशी लढत आहोत, त्यांच्यासमोर आम्ही कधीच झुकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणुका होत आहेत. जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. या पोटनिवडणुकांतही बसपने उमेदवार उभे केले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख